'राहुल गांधींनी VD Savarkar यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही'- Uddhav Thackeray

ते म्हणाले, ‘सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले आणि त्यांनी इंग्रजांना घाबरून दयेचे अर्ज लिहिला.’

Rahul Gandhi and Uddhav Thackeray | | (Photo credit: archived, edited, Representative images)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विनायक दामोदर सावरकरांवर (VD Savarkar) केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. आपल्या पक्षाला सावरकरांबद्दल नितांत आदर असून, राहुल गांधींनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल केलेल्या वक्तव्याचे आपण समर्थन करत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले. यासोबतच सावरकरांना केंद्र सरकारने अद्याप भारतरत्न का दिला नाही, असा सवालही ठाकरे यांनी केला.

सावरकर यांनी इंग्रजांना घाबरून दयेच्या पत्रावर स्वाक्षरी केली, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यानंतर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या टिप्पणीचे आम्ही समर्थन करत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आपल्याला नितांत आदर आणि श्रद्धा आहे, जी पुसली जाऊ शकत नाही. त्याचबरोबर भाजपनेही याबाबत राजकारण करू नये, असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि माजी राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला हजेरी लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उद्धव ठाकरे यांनाही राहुल गांधींच्या दौऱ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, ठाकरे अद्याप यात्रेत सहभागी झालेले नाहीत.

दुसरीकडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्ही डी सावरकरांबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी एका स्वातंत्र्य सैनिकांबद्दल पूर्णपणे खोटे बोलत आहेत. त्यांना योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता चोख प्रत्युत्तर देईल, असेही ते म्हणाले. राहुल गांधींवर निशाणा साधताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील जनता हिंदुत्वाच्या विचारधारेचा अपमान सहन करणार नाही. (हेही वाचा: Sanjay Raut Statement: वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा, संजय राऊतांची मागणी)

भारत जोडो यात्रेदरम्यान मंगळवारी वाशिम जिल्ह्यात आयोजित सभेत राहुल गांधींनी हिंदुत्ववादी विचारवंत सावरकरांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले आणि त्यांनी इंग्रजांना घाबरून दयेचे अर्ज लिहिला.’