Waterlogging at Mumbai: 'धादांत खोटे बोलणारे हे सरकार'; पहिल्या पावसामुळे मुंबई शहरात अनेक ठिकाणी साचले पाणी; शहर काँग्रेसच्या अध्यक्षा Varsha Gaikwad यांची शिंदे सरकारवर टीका
याचा अर्थ मुंबईमध्ये उद्याही मुसळधार पावसाची शक्यता आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सूनला विलंब झाला आहे.
मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) मुंबई (Mumbai) शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे प्रकार समोर आले. पावसामुळे अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अशात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
गायकवाड यांनी एक महिला रस्ता ओलांडण्यासाठी धडपडत असल्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, गुडघ्यापर्यंत साचलेल्या पाण्यात एक महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी तिला इतर पुरुष मदत करत आहेत. पावसामुळे अनेक गाड्या व्हिडिओमध्ये अडकल्याचेही दिसत आहे.
गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मुख्यमंत्री महोदय आम्ही आपणांस यापूर्वीच सांगितले होते की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले गेले नाही. पावसाची पहिली सर आणि मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. धादांत खोटे बोलणारे हे सरकार आणि यांचे अधिकारी!’
गायकवाड पुढे म्हणतात, ‘अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचलं आहे. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण? उत्तर द्या.’ (हेही वाचा: Mumbai: शिवाजी नगर येथे भूमिगत गटार साफसफाईचे काम करताना मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू)
दरम्यान, मुंबईसाठी आयएमडीने पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ मुंबईमध्ये उद्याही मुसळधार पावसाची शक्यता आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सूनला विलंब झाला आहे.