Rahul Narvekar: आमदार अपात्रता प्रकरणी कारवाई कधी? राहुल नार्वेकर यांनी दिले उत्तर

या प्रकरणात लवकच सुनावणी सुरु होईल. कायदा आणि नियम यांचा सर्वांगीण विचार, पालन करुणच कोणताही निर्णय घेतला जाईल. त्यासाठी या आमदारांना लवकरच सुनावणीसाठी बोलावण्यात येईल, असेही राहुल नार्वेकर म्हणाले.

Rahul Narvekar (PC- Facebook)

Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना (Shiv Sena) पक्षातील बंडखोरीला आता बराच काळ उलटून गेला आहे. आता तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणात बजावलेल्या नोटीशीला उत्तर देण्याची वेळही संपली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता कारवाई कधी? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सहाजिकच संधी मिळताच पत्रकारांनी दस्तुरखुद्द अध्यक्षांनाच याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबई येथे बुधवारी (23 ऑगस्ट) ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, या प्रकरणात उचित कारवाई सुरु आहे. अशा प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष जेव्हा काम करतात तेव्हा ते ‘क्वाजय ज्युडिशियल ऑथेरिटी’ म्हणून सक्रीय असतात. त्याचे मला भान आहे. त्यामुळे या प्रकरणावर बाहेर अधिक चर्चा न करता कायदा आणि नियम याला अनुसरुन आवश्यक आणि योग्य ती कारवाई केली जाईल.

आमदार अपात्रता प्रकरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. या प्रकरणात लवकच सुनावणी सुरु होईल. कायदा आणि नियम यांचा सर्वांगीण विचार, पालन करुणच कोणताही निर्णय घेतला जाईल. त्यासाठी या आमदारांना लवकरच सुनावणीसाठी बोलावण्यात येईल, असेही राहुल नार्वेकर म्हणाले.

शिवसेना बंडखोर आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. यावर प्रदीर्घ सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंनी तगडे वकील देण्यात आले. त्यांनी कायद्याचा येथेच्छ किस पाडला. त्यामुळे या प्रकरणाला देशभरात ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या आणि शेवटी निर्णय देताना तो विधानसभा अध्यक्षांवर सोपवला. सध्या राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत. ते काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, या वेळी बोलताना नार्वेकर यांनी चांद्रयान ३ मोहिमेबद्दली भाष्य केले. ते म्हणाले, ही मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काही काळातच हे यान चंद्रावर यशस्वीपणे उतरेल अशी आशा आहे. सर्व भारतीय या क्षणाची अतुरतेने वाट पाहात आहेत. या मोहिमेचा सर्व भारतीय नागरिकांना अभिमान वाटत आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो.