केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या युवकाची धुलाई; समर्थकांची महाराष्ट्र बंदची हाक
महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भर सभेत मारहाण करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (Republican Party of India) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री (Union Minister) रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना भर सभेत कानशिलात लगावण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात सुरु असलेल्या एका कार्यक्रमात एका तरुणाने रामदास आठवले यांना कानशिलात लगावली. त्यावेळेस त्याठिकाणी पोलिसही उपस्थित होते. कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रविण गोसावी असून त्यानंतर आठवले समर्थकांनी त्याला पकडले आणि चांगलीच धुलाई केली.
शनिवारी रात्री ठाण्यातील अंबरनाथ येथे एका कार्यक्रमासाठी रामदास आठवले गेले होते. मंचावरुन खाली उतरताच एक युवक त्यांना कानशिलात लगावली आणि तिथून पळून जावू लागला. तितक्यात आठवले समर्थकांनी त्याला पकडले आणि चांगला चोप दिला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आठवले समर्थकांनी चोप दिल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या युवकाला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. युवकाच्या वर्तनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या सर्व अनुचित प्रकारावर आठवले म्हणाले की, मला मारण्याचा हा कट पूर्वनियोजित होता. या कटामागील मुख्य सुत्रधाराला अटक व्हायला हवी. 9 डिसेंबरला आम्ही महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. आठवलेंवर झालेल्या हल्ल्यानंतर समर्थकांनी आठवलेंच्या घराबाहेर एकच गर्दी केली. त्याचबरोबर या प्रसंगाच्या निषेधार्थ आठवले समर्थक रस्त्यावर उतरणार आहेत.
काही दिवासांपूर्वी मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही, असे वक्तव्य आठवले यांनी केले होते. त्यामुळेच कदाचित हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. यापूर्वी गुजरातमधील सुरत येथे रामदास आठवलेंच्या कार्यक्रमादरम्यान एका युवकाने आठवलेंवर काळा कपडा फेकला होता.