Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा; सामना संपादकीयातून जोरदार हल्लाबोल

सामना संपादकीयात नारायण राणे यांच्या अटकेचे समर्थन करतानाच त्यांना भोक पडलेला फुगा असेही संबोधण्यात आले आहे.

Narayan Rane | Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायणर राणे (Narayan Rane) जोरदार चर्चेत आले. त्याची राज्य सरकारनेही दखल घेतली. त्यानंतर राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन थेट अटकही झाली. काल (मंगळवार, 25 ऑगस्ट) दिवसभर सुरु राहिलेला हा हायहोल्टेज ड्रामा महाड कोर्टाने राणे यांना सशर्थ जामीन मिळाल्यानंतर संपला. यानंतर आज शिवसेना मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामना (Daily Saamana) संपादकीयातून पुन्हा एकदा नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. सामना संपादकीयात नारायण राणे यांच्या अटकेचे समर्थन करतानाच त्यांना भोक पडलेला फुगा असेही संबोधण्यात आले आहे. वाचा सामनाचा अग्रलेख (Daily Saamana Editorial) जसाच्या तसा.

नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरून फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱया बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ‘‘मी ‘नॉर्मल’ माणूस नाही,’’ असे त्यांनी जाहीर केले. मग ते ऍबनॉर्मल आहेत काय ते तपासावे लागेल. (हेही वाचा, Shiv Sena Targets Maharashtra Governor: राज्यपाल, आठवा महिना आणि निर्णयाचा पाळणा; शिवसेनेचे बाण)

मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये राणे हे अती सूक्ष्म खात्याचे लघु उद्योगमंत्री आहेत. पंतप्रधान स्वतःला अत्यंत ‘नॉर्मल’ माणूस म्हणवून घेतात. ते स्वतःला फकीर किंवा प्रधानसेवक म्हणवून घेतात, हा त्यांचा विनम्र भाव आहे, पण राणे म्हणतात, ‘मी नॉर्मल नाही. त्यामुळे कोणताही गुन्हा केला तरी मी कायद्याच्या वर आहे.’ राणे व संस्कार यांचा संबंध कधीच नव्हता. त्यामुळे केंद्रीय मंत्रीपदाची झूल अंगावर चढवूनही राणे हे एखाद्या छपरी गँगस्टरसारखेच वागत-बोलत आहेत. भारतीय जनता पक्षाचा सध्या जो कायाकल्प सुरू आहे या नवनिर्मितीत राणे यांच्यासारख्यांना मानपान मिळत आहेत. म्हणूनच ‘नॉर्मल’ नसलेल्या राणेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ‘मारहाण’ करण्याची बेलगाम भाषा केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी ही भाषा वापरणे म्हणजे 105 हुतात्म्यांच्या भावनांना लाथ मारण्यासारखेच आहे. राणे यांनी महाराष्ट्राला लाथ मारली व त्यांचे नवे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील राणेंच्या बेताल वक्तव्याचे समर्थन करीत आहेत. राणे यांना तसे बोलायचे नव्हते, अशी मखलाशी करू लागले आहेत. फडणवीस-पाटील यांच्या गळ्यात राणे नावाचा फाटका फुगा अडकला आहे. त्यामुळे सांगता येत नाही, सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अशा वेळी संस्कारी राजकारणी महाराष्ट्राची माफी मागून मोकळे झाले असते. कारण महाराष्ट्राच्या अस्मितेपुढे कोणीही मोठे नाही, पण भाजपसाठी महाराष्ट्राची अस्मिता आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा हे गौण विषय आहेत.

महाराष्ट्रात सध्या भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा ‘जनआशीर्वाद’ नावाचा महामारीचा फेरा सुरू आहे, तो चेष्टेचाच विषय बनला आहे. एक मंत्री दानवे हे राहुल गांधींवर टीका करण्याच्या नादात मोदी यांनाच बैलाची उपमा देऊन गेले, तर दुसरे सूक्ष्म खात्याचे लघु उद्योगमंत्री शिवसेना व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हवे तसे बरळत सुटले. महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी करीत ‘तुझा मुख्यमंत्री गेला उडत,’ अशी जाहीर वक्तव्यं करीत आहेत. ‘‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवू.’’ या भाषेत नारायण राणेंनी मुख्यमंत्री या संस्थेचा उद्धार केला आहे. मुख्यमंत्रीपद ही व्यक्ती नसून घटना व संसदीय लोकशाहीचे कवच असलेली संस्था आहे. तुम्ही व्यक्तीवर टीका करा. तुमच्या भुंकण्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही, पण राज्याचे नेतृत्व करणाऱया नेत्यावर शारीरिक हल्ला करण्याची भाषा करणारा माणूस महाराष्ट्राच्या मातीत निपजावा याची वेदना सगळय़ांना आहे. अशा उपटसुंभांना भारतीय जनता पक्षाने ‘मांडीवर’ घ्यावे हे त्यांच्या संस्काराचे अधःपतन आहे.

शरद पवार यांच्यासारख्या लोकमान्य नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करणारे लोकही भाजपने उधारीवर घेतले आहेत व हे लोक पवारांवरही ऊठसूट हल्ले करीत आहेत. एका माकडाच्या हाती दारूची बाटली होतीच. आता दुसरे माकडही बाटली घेऊन उडय़ा मारीत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याची भाषा केल्याने महाराष्ट्राच्या संयमाचा बांध तुटला आहे. या किरकोळ व्यक्तीस शिवसेनेने मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचविले, सर्वोच्च पदे दिली, पण नंतर हे महाशय शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेले. शिवसेना सोडून २० वर्षांचा काळ उलटला तरी या महाशयांचे शिवसेनाद्वेषाचे तुणतुणे सुरूच आहे. या काळात त्यांनी सरडा लाजेल असे रंग बदलले. त्यांचे भांडवल एकच, ते म्हणजे शिवसेना व ठाकऱ्यांवर यथेच्छ चिखलफेक करणे. त्या चिखलफेकीचे ‘इनाम’ म्हणून महाशयांना सूक्ष्म उद्योगाचे मंत्रीपद भाजपने केंद्रात दिले आहे. ते खाते इतके सूक्ष्म आहे की, हाती लाल दिव्याच्या गाडीशिवाय काहीच लागलेले नाही. त्यामुळे शिवसेनेवर भुंकण्याचे जुनेच उद्योग त्यांनी सुरू ठेवले आहेत.