South Mumbai Lok Sabha Election Result 2024: ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंत विजयाच्या हॅटट्रिक गुलाल उधळणार की यामिनी जाधव धक्का देणार? दक्षिण मुंबई मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष

शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उतरवण्यात आलं. 2014, 2019 सलग दोनवेळा अरविंद सावंत विजयी झाले आहेत.

Photo Credit- Facebook

Mumbai South Lok Sabha Election Result 2024: देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई. मुंबईच्या दक्षिण मतदारसंघात (South Mumbai Lok Sabha Election Result 2024) लोकसभा निवडणूकीची लढत चुरशीची ठरली आहे. दोन कडवट शिवसैनिकांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना उतरवण्यात आलं. 2014, 2019 सलग दोनवेळा अरविंद सावंत विजयी झाले आहेत. यंदा शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे अरविंद सावंतांसमोर तगडा उमेदवार देण्यासाठी महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. मतदानाचा निकाल (MumbaiLok Sabha Election Result 2024) आता अवघ्या काही तासांवर आला असून या लढतीत कोण बाजी मारणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

अरविंद सावंत-

उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक नेते आणि पक्षाचे प्रवक्ते म्हणून अरविंद सावंत मतदारसंघात आपला माणूस म्हणून 'भाई' या नावाने ओळखले जातात. राजकारणात येण्यापूर्वी एमटीएनलचे अधिकारी म्हणून काम करणाऱ्या सावंत यांनी शिवसेनेत आल्यानंतर केंद्रीयमंत्रिपदापर्यंत मजल मारली. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या अरविंद सावंतांनी 2014 आणि 2019 मध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 2019 च्या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत सावंत यांना 4,21,937, तर देवरा यांना 3,21,870 इतकी मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही डॉ. अनिल कुमार यांना रिंगणात उतरवले होते. त्यांना 30,348 मते मिळाली होती.

कोण आहेत यामिनी जाधव?-

यामिनी जाधव या सध्या भायखळा विधानसभेच्या आमदार आहेत. त्यांनी नगरसेवक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. २०१२ साली पहिल्यांदा त्या मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या. महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं. मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघातून यामिनी जाधव यांनी बाजी मारली. जाधव यांनी कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा व मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ईडीचा ससेमिरी यशवंत जाधव यांच्या मागे लागला. त्यांच्या मालमत्तांवर तब्बल चार दिवस छापे सुरू होते. जाधव यांनी अनेक बनावट कंपन्या उघडल्या होत्या. तसंच, मुंबईत अनेक मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आलं होतं. त्यांच्या नावे मुंबईत असलेले ३० ते ४० फ्लॅट प्राप्तिकर खात्यानं जप्त केले होते.