Kalyan Lok Sabha Seat: उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करुन घेणार आढावा, श्रीकांत शिंदेविरोधात तगडा उमेदवार देणार
याठिकाणी ठाकरे कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात येईल. यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Srikant Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून (Thackeray Group) जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. या ठिकाणी तगडा उमेदवार देण्याची तयारी सूरु केली आहे. यासाठी 13 जानेवारी रोजी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कल्याण पूर्व (Kalyan) भागातील कोळसेवाडी परिसरात येणार आहेत. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीत येणार आहेत. (हेही वाचा - Congress: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठे फेरबदल, रमेश चेनिथल्ला बनले महाराष्ट्राचे प्रभारी)
कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. याठिकाणी ठाकरे कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात येईल. यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हा प्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख शरद पाटील, उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पाटील, माजी महापौर रमेश जाधव, धनंजय बोडारे आणि चंद्रकांत बोडारे उपस्थित होते.
दरम्यान या बैठकीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटावर जोरदार टिका केली आहे. शिवसेना शिंदे गटावर टीका करत ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय साळवी म्हणाले, ज्यांना पाळलं पोसलं. पाणी पाजलं. अन्न दिले, सर्व दिले, ते पाठीत खंजीर खुपसून गेले. इतकेच नाही तर या माणसाने संघटनेवर घाला घातला. ही ज्वाला तुमच्या हृदयात पेटली आहे.