'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने दुमदुमणार अयोध्यानगरी; हजारोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयाचे साक्षीदार होता यावे म्हणून हजारो शिवसैनिक स्वखर्चाने अयोध्येला गेले आहेत
Uddhav Thackeray's Ayodhya visit : सेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजली आहे. आज दुपारी उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल होणार आहेत. काल त्यांनी अयोध्येला जाण्यापूर्वी शिवनेरी गडावरच्या शिवजन्म स्थळाचं दर्शन घेतले, शिवनेरीवरील मातीचा मंगलकलश घेऊन ते अयोध्येला रवाना होणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर प्रश्नावर शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली असून, मंदिर वही बनाएंगे म्हणत लोकांना आणखी किती काळ मूर्ख बनवाल? अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यभरातले हजारो शिवसैनिक अयोध्येत उद्धव ठाकरेंची साथ देणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयाचे साक्षीदार होता यावे म्हणून हजारो शिवसैनिक स्वखर्चाने अयोध्येला गेले आहेत. 'हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार', 'जय श्रीराम', 'जय भवानी, जय शिवाजी', असा जयघोष करत शिवसैनिकांची 'अयोध्या विशेष ट्रेन' काल दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी ठाणे स्टेशनातून मार्गस्थ झाली. 24 डब्यांची ही ट्रेन जवळ जवळ 1500 शिवसैनिकांनी खच्चून भरलेली असून आज (शुक्रवारी) सायंकाळी ही ट्रेन अयोध्येत दाखल होणार आहे. ठाणे, भिवंडी, पालघर मतदारसंघातील हे सर्व शिवसैनिक असल्याची माहिती मिळत आहे. (हेही वाचा : आता निवडणुकीच्या आखाड्यात महाराष्ट्र क्रांती सेना; लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवणार)
कार्यक्रम –
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबर असे दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे शनिवारी सायंकाळी अयोध्येत शरयू आरती करणार आहेत. त्याच वेळी देशभरातील विविध मंदिरांमध्येही महाआरती होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत जाहीर सभा घेण्यावर बंदी आहे, त्यामुळे आता जनसंवादाचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. प्रथम संत महंतांचे आशीर्वाद घेण्याचा कार्यक्रम आहे. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे शरयू नदीच्या आरतीला उपस्थित राहतील. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता रामललाच्या दर्शन आणि त्यानंतर 11 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे.