तुकाराम मुंढे यांच्यावर मोठी जबाबदारी; मंत्रालयात सह सचिव म्हणून नियुक्ती

नाशिकच्या आयुक्तपदावरून पायउतार झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील नियोजन विभागात सह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

तुकाराम मुंढे (Photo credit : twitter)

12 वर्षांत तब्बल 11 वेळा बदली झालेले वादग्रस्त अधिकारी, तुकाराम मुंढे यांची नाशिक येथूनही बदली करण्यात आल्याचे वृत्त होते. या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. तुकाराम मुंढेसारख्या तत्वनिष्ट आणि न्यायाने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळेच इतर लोकप्रतिनिधी आणि नेते यांच्यावर जरब बसते, आणि हीच गोष्ट खटकत असल्याने तुकाराम मुंढे यांना नाशिकच्या आयुक्तपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. मात्र आता मुंढे यांची नाशिकवरून मंत्रालयातील नियोजन विभागात सह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांचे नियुक्ती पत्र

आज सकाळपर्यंत मुंढे यांना त्यांच्या बदलीचे कोणतेही लेखी पत्र देण्यात आले नव्हते, म्हणूनच आज नाशिक महापालिकेत आल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या कामकाजाला सुरुवात केली. मात्र, अखेर मुंढेंना बदलीसंदर्भातील पत्र देण्यात आले आहे, त्यानुसार त्यांनी आपले कार्यालय सोडले असून नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे पदभार सोपवला आहे. तुकाराम मुंढेंची 12 वर्षांच्या कारकीर्दीतील ही बारावी बदली आहे.

मुंढे यांनी नाशिकच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पालिका प्रशासनात चांगले बदल घडले होते. कामकाजात सुसूत्रता आल्याचा अनुभव नागरिकांना येत होता. मात्र कडक शिस्तीच्या तुकाराम मुंढे यांच्यासोबत काम करणे स्थानिक लोकप्रतिनिधींना जड जात होते. यामुळेच गेले काही महिने तुकाराम मुंढे यांची नाशिक इथून बदली व्हावी यासाठी प्रयत्न चालू होते. नाशिक महापालिकेत मुंढे यांच्याविरूध्द अविश्वास ठरावदेखील दाखवण्यात येणार होता. मात्र मुंढे यांच्यावर मुख्यमंत्र्यांची मर्जी असल्याने ही गोष्ट घडू शकली नाही. मात्र आता या नव्या बदलीच्या आदेशामुळे तुकाराम मुंढे जिल्ह्यानंतर थेट राज्याचे नियोजन सांभाळणार आहेत.