पावसाळ्यात प्रवाशांना त्रास झाल्यास एसटी मंडळाच्या अधिकाऱ्यांना करवणार गळक्या बसची सैर, दिवाकर रावते यांचा दबंग निर्णय
ज्यानुसार यापुढे प्रवाश्यांना जो त्रास होईल तो स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना देखील सहन करावं लागेल.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रविवारी पावसाच्या सरींचे सुखद आगमन झाले पण दोन दिवस न होताच वाहतुकीच्या समस्यांनी तोंड वर काढायला सुरवात केली. एसटी महामंडळाच्या गाड्यांची गळकी छप्परे, बस स्टॉप वरील पायाभूत सुविधांचा अभाव याविषयी अनेक तक्रारी या निमित्ताने पुन्हा समोर आल्या होत्या. मात्र आता या तक्रारींचं तात्काळ निवारण व्हावं यासाठी परिवहन मंत्री (Transport Minister) व एसटी महामंडळाचे (MSRTC) अध्यक्ष दिवाकर रावते (Diwakar Raote) यांनी एक हटके निर्णय घेतला आहे. ज्यानुसार यापुढे पावसाळ्यात एसटी गळकी दिसल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याच एसटीतून फेरफटका मारला जाणार आहे. प्रवाशांचा त्रास स्वतः अनुभवल्यावर तरी या समस्या सोडवण्यासाठी तातडीने काम केले जाईल असा यामागील हेतू असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने जादा बस सोडण्याच्या चर्चेसाठी सोमवारी पुण्यात महामंडळाची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये गळक्या बसच्या दुरुस्ती संदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितला गेला त्यावेळी अधिकाऱ्यांनी काम पूर्ण झाल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्ष परिस्थीती पाहता रविवारी पडलेल्या पावसांनंतर अनेक ठिकाणी बसचे छप्पर गळत असल्याचे निदर्शनास आले. खरतर गळक्या बसची दुरुस्ती करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीच पुरेसा वेळ देऊन देखील अजूनही तक्रारी ऐकू येत असल्याने संतप्त रावते यांनी या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे आता जर लवकरात लवकर या अधिकाऱ्यांनी योग्य ते काम केले नाही तर त्यांना येत्या पावसात गळक्या एसटीची सैर करायला लागू शकते. Ashadhi Ekadashi 2019: विठ्ठल-रखुमाई च्या भाविकांसाठी एसटी सज्ज; आषाढी एकादशी च्या काळात धावणार 3724 विशेष गाड्या
कामाकडे दुर्लक्ष.. कार्यालयाचा वीज पुरवठा बंद
बुलढाणा जळगाव जिल्ह्यातील काही बस स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी इलेक्ट्रिक पंखे बसवण्यात आले होते . मात्र कित्येक दिवसांपासून हे पंखे बंद असल्याची तक्रार केली जात होती. नवीन पंखे बसवण्यासाठी एसटीच्या मुंबईतील भांडार व खरेदी विभागाकडे दोन महिन्यांपासून प्रस्ताव देण्यात आला होता. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे लक्षात येताच दिवाकर रावते यांनी सोमवारी भांडार व खरेदी कार्यालयातील वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना पंखे, एसी शिवाय काम करावे लागले.यानंतर एका दिवसातच या विभागाने हा प्रस्ताव मंजूर केला.
दरम्यान दिवाकर रावते यांच्या या दबंग निर्णयांमुळे एसटी महामंडळात कामांना वेग आला आहे. तसेच त्यांच्या या कार्यतत्परतेसाठी सर्वांकडून कौतुक केले जात आहे.