मुंब्रा: ट्रॅफिक पोलिसाने हटकल्यावर तरुणाने केला हल्ला, कपडे फाडून भर रस्त्यात केली मारहाण
इतकेच नव्हे तर या झटापटीत पोलिसांचे कपडेही फाडले, तर एकाने चक्क पोलिसाचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंब्रा: सामान्य नागरिकांच्या रक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना नुकतीच मुंब्रा (Mumbra) येथे घडल्याचे समजत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ मध्ये काही तरुणांनी वाहतूक पोलीस (Traffic Police) कर्मचाऱ्यांना भररस्त्यात मारहाण केल्याचे पाहायला मिळत आहे इतकेच नव्हे तर या झटापटीत पोलिसांचे कपडेही फाडले. यातील काही जणांनी तर चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळण्याचा सुद्धा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर तिघांना अटक करण्यात आले आहे .
प्राप्त माहितीनुसार, मुंब्रा वाहतूक विभागाच्या वतीने कन्व्हर नगर येथे रस्त्यावर तपासणी सुरु होती. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंबाते यांच्या कारवाई दरम्यान काही बाईकवरून जाणाऱ्या काहींना पकडले होतं. यानंतर काही तरुण आणि एका महिलेने पोलिसांशी भांडायला सुरुवात केली, म्ह्णून पोलिसांनी वाहतूक परवाना ताब्यात घेतला. मात्र यामुळे हे तरुण भडकले आणि त्यांनी चक्क वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. हा प्रकार भररस्त्यात सुरु असल्याने लोकांची गर्दी जमली होती. गर्दीचा फायदा घेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाइल देखील चोरण्यात आला.
या प्रकारात अंगद मुंडे, प्रशांत गोसावी, दिनेश राऊत व विनायक वाघमारे या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला होता. ज्यांनंतर पोलिसांनी अफनान कुरेशी, शमसुद्दीन अहमद बांगी, तमसील अफाक कुरेशी व फैजान शेख या चौघांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. यातील एकजण अद्याप फरार आहे.