टिली मिली: 1-8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून सह्याद्री चॅनेलवर विशेष मालिका

टिली मिली असं या मालिकेचं नाव असून आजपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कार्यक्रमातून शिक्षण खुले करण्यात आले आहेत

education | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना जागतिक आरोग्य संकटाचा फटका जगभरात शिक्षण व्यवस्थेला देखील बसला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा कहर अद्याप सुरूच असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरीही अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. दरम्यान विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू व्हावे म्हणून महाराष्ट्रात आज (20 जुलै) पासून सह्याद्री चॅनलवर विशेष कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहेत. टिली मिली असं या मालिकेचं नाव असून आजपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कार्यक्रमातून शिक्षण खुले करण्यात आले आहेत. सध्या हे केवळ मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. गडचिरोलीसह राज्यातील शाळा 3 ऑगस्टपासून सुरू होणार; विजय वडेट्टीवार यांची माहिती

10 आठवड्यामध्ये सुमारे 480 एपिसोडची ही मालिका आजपासून सुरू झाली आहे. सध्या या मालिकेचे प्रसारण 26 सप्टेंबर पर्यंत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून दुपारी 12.30 वाजेपर्यंत या मालिकेच्या एपिसोड्सचे इयत्तेप्रमाणे प्रसारण केले जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी या मालिकेच्या माध्यमातून शिक्षण सुरू करण्याचं आवाहन केलं आहे.

टिली मिलीचं वेळापत्रक

पुण्यामधील स्वयंसेवी संघटना, एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन यांच्या मदतीने पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाचे मालिकांमध्ये रूपांतर करून ते राज्यातील कानाकोपर्‍यात राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी देखील इतर पर्यायांचा विचार केला जात आहे. महाराष्ट्रात काही शाळांमध्ये ऑनलाईन वर्गांनादेखील सुरूवात झाली आहे.



संबंधित बातम्या