बीड: जमीनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निघृण हत्या; 12 जण अटकेत
ही घटना बीड (Beed) येथील केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्री 11 ते मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात तिहेरी हत्याकांडचा गुन्हा दाखल केला आहे.
जमीनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या (Three Of Family Killed Over Land Row) करण्यात आली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बीड (Beed) येथील केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्री 11 ते मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात तिहेरी हत्याकांडचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणातील इतर आरोपींचाही शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी अगोदरच खुनाचा कट रचून तिघांची हत्या केली आहे. एवढेच नव्हेतर, संबंधित व्यक्तींना पळून जाता येऊ नये म्हणून त्यांची मोटार सायकलही जाळून टाकण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिहेरी हत्याकांडमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार, असे हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. बाबू शंकर पवार आणि निंबाळकर यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जमीनीचा वाद सुरु आहे. या वादावरूनच बाबू शंकर पवार यांचे मुले संजय आणि प्रकाश यांची निघृण हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस ठाण्यातील पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री हल्लेखोरांनी नियोजनबद्ध हल्ला केला. जवळपास 40 जण ट्रॅक्टरने आले होते व त्यांनी पाठलाग करून तिंघावर हल्ला केला. याप्रकरणी निंबाळकर कुटुंबियातील 12 जणांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत, असेही पोद्दार यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रातील मूर्तीकार नाराज; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सर्व पीओपीच्या मूर्तीवर निर्बंध
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आली आहे. तसेच काही भागात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हेगारींच्या संख्येत घट झाल्याचे दिसत असताना बीड येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. तसेच याप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशा मागणींही जोर धरला आहे.