Eknath Shinde On Uddhav Thackeray: हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे! आम्ही तुमच्यासारखं सत्तेसाठी मिंधे झालेलो नाहीत; एकनाथ शिंदे यांच उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
आज याच मैदानावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.
Eknath Shinde On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अत्यंत जहरी शब्दांत टीका केली आहे. हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे! शिंदेच्या रक्तात बेईमानी नाही, आम्ही तुमच्यासारखं सत्तेसाठी मिंधे झालेलो नाही, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान, 5 मार्च रोजी खेडमधील गोळीबार मैदानावर आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता याच मैदानावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, काश्मीरमधील 370 कलम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हटवलं, त्यांनी अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली, त्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांच्यासोबत जाण्याची आमची भूमिका चुकीची कशी असू शकते? असा सवालही यावेळी एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच ज्यांनी देश लुटला, ज्यांनी मुंबईत बाँबस्फोट घडवून आणले त्यांच्यासोबत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलात, अशी जहरी टीकादेखील यावेळी शिंदे यांनी केली. (हेही वाचा -Maharashtra Politics: आमच्यात कोणतेही भांडण नाही, शिंदे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे वक्तव्य)
गद्दारी आम्ही केली नाही तर तुम्ही 2019 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी केली. जर आता आम्ही बंडखोरी केली नसती, तर ती बाळासाहेबांच्या विचारांसोबत बेईमानी ठरली असती. आज ठाकरे गटाच्या आदळआपटला आणि थयथयाटाला उत्तर देण्यासाठी येथे आलो नाही तर कोकणातील शिवसैनिकांच्या प्रेमाखातर आलो असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडे गद्दारी, खोके याच्याशिवाय दुसरे शब्दच नाहीत. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यात अर्थ नाही. महाराष्ट्राभर त्यांचे सर्कशीप्रमाणे खेळ होणार आहेत, अशी खोचक टीकाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली. कोकणाने बाळासाहेबांना भरभरून प्रेम दिलं आणि आजही कोकणी माणूस बाळासाहेबांच्या विचारांसोबत आहे. त्यामुळे आम्हाला कोणालाही उत्तर देण्याची गरज नाही, असंही शिंदे यावेळी म्हणाले.