महाराष्ट्र विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल- शरद पवार

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.

Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यात आता विधानसभेचे नवा अध्यक्ष याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना याबाबत विचारले असता विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.

नाना पटोले यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावर शरद पवारांना यांना विचारले असता "काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे" असे शरद पवार म्हणाले.हेदेखील वाचा- काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

"विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं, आता ते खुलं झालं आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं शरद पवार म्हणाले. नवी दिल्लीत पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

नाना पटोले काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण? हा सवाल उपस्थित होत आहे. जर पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा अध्यक्ष, काँग्रेसचाच होणार की शिवसेनेचा? याबाबतही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असणाऱ्या नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. दिल्लीतील 10 जनपथ या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीत राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीनंतर अध्यक्षपदाचा राजीनामा आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या एक पाऊल जवळ नाना पटोले पोहोचले असल्याचे बोलले जात आहे.