Ineligible Ration Card: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी शोधमोहीम सुरू

शिधापत्रिकाधारकाला पुरावा म्हणून निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, बँक पासबुक, विजेचे बील, टेलीफोन बील, ड्राइव्हिंग लायसन्स, ओळखपत्र आदीचे झेरोक्स प्रत देता येईल.

रेशनाकार्ड (Photo Credits- Facebook)

Ineligible Ration Card: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील कार्यरत बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी ,शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्याच्या सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिल्या आहेत. 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतन प्रक्रिया आहे. त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरता विभागाकडून खास शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात लोकमत या मराठी वेबसाईटने वृत्त प्रकाशित केलं आहे.

दरम्यान, अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम राबविण्यासाठी त्या भागातील अधिकृत शिधावाटप दुकानातून शासकीय कर्मचारी, तलाठी, यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुना फॉर्म वाटप करण्यात येणार आहेत. नागरिकांना हे फॉर्म विभागाने दिलेल्या मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात जमा करावे लागणार आहेत. हा फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांना ते ज्या भागात राहत आहेत, तेथील पुरावा द्यावा लागणार आहे. (वाचा - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; केशरी शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार 'ही' सुविधा)

शिधापत्रिकाधारकाला पुरावा म्हणून निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, बँक पासबुक, विजेचे बील, टेलीफोन बील, ड्राइव्हिंग लायसन्स, ओळखपत्र आदीचे झेरोक्स प्रत देता येईल. मात्र, शिधापत्रिकाधारकाने पडताळणीसाठी दिलेला पुरावा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचा नसावा, अशी सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.