#ViralVideo ठाणे: नौपाडा परिसरात मराठी- गुजराती वाद सोशल मीडियावर; मनसे कार्यकर्त्यांची वादात उडी
अशातच मनसे (MNS) कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने वाद आणखीनच चिघळला गेला आहे.
ठाणे: नौपाडा (Naupada) येथील सुयश सोसायटीमध्ये (Suyash Society) एका क्षुल्लक कारणातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर आता सामाजिक मुद्द्यापर्यंत येऊन पोहचले आहे. अशातच मनसे (MNS) कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने वाद आणखीनच चिघळला गेला आहे. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मारामारीचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत होता. हा व्हिडीओ ठाण्यातील सुयश अपार्टमेंट मधील आहे. व्हिडिओसोबत फिरणाऱ्या पोस्ट मध्ये सोसायटीतील रहिवाशी हसमुख शहा (Hasmukh Shah) व राहुल पैठणकर (Rahul Paithankar) यांच्यामध्ये लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवल्याने काहीसा वाद झाला होता, यावेळेस शहा यांनी आपल्या मुलासोबत जाऊन राहुल यांना शिवीगाळ व मारहाण केली इतकेच नाही तर त्यांना मराठी भाषेवरून हिणवत अनेक आक्षेपार्ह्य विधाने केली, असे सांगण्यात आले होते. तर पोलिसांच्या माहितीनुसार या दोघांमध्ये वाद होऊन दोघांनीही शिवीगाळ व मारामारी केली असे सांगण्यात येत आहे. याशिवाय नौपाडा पोलीस स्थानकात याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
पहा व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियातील व्हायरल व्हिडीओनुसार, हसमुख शहा आणि राहुल पैठणकर यांच्यातील वाद हा लिफ्टचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे सुरु झाला होता. त्यानंतर धक्कबुक्की होऊन या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. वास्तविक पोलिसांच्या माहितीनुसार , हे दोघेही या प्रकरणाला प्रांतिक वादाचा मुद्दा बनवत असल्याने त्यांना नोटीस धाडण्यात आली होती यामध्ये हा प्रकार न थांबल्यास आयटी कायद्याद्वारे गुन्हा दाखल केला जाईल असेही सांगण्यात आले होते.
या सर्व प्रकारानंतर नौपाडा येथील मनसे कार्यकर्त्यांनी याप्रकरणात उडी घेत स्वतः तपास करायला सुरुवात केली. यावेळेस हसमुख शहा हे कुठेतरी निघून गेल्याने कार्यकर्त्यांच्या हाती लागले नाहीत, मात्र सकाळी पुन्हा जाऊन या कार्यकर्त्यांनी शहा यांच्याकडून आपली चूक काबुल करून घेतली तसेच शहा यांनी आपण मराठी माणसांच्या भावना दुखावल्यासाठी क्षमा मागतानाचा एक व्हिडीओ देखील फेसबुकवर पाहायला मिळत आहे.
मनसे कार्यकर्त्यांची फेसबुक पोस्ट
दरम्यान याप्रकरणी व्हायरल व्हिडीओ मध्ये समोर येणारी आणि पोलिसांतर्फे दिली गेलेली माहिती यामध्ये काहीशी तफावत आढळून येत आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरु असून राहुल पैठणकर व हसमुख शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.