Tamhini Ghat Road Closure: ताम्हिणी घाट 5 ऑगस्ट पर्यंत वाहतूकीसाठी बंद

पावसाच्या दिवसात ताम्हिणी घाटात लॉंग़ ड्राईव्ह करत निसर्गाचं खुललेलं रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

Tamhini Ghat | X

महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं आहे. या मुसळधारींमुळे रायगड-पुणे जिल्ह्यांना (Pune-Raigad) जोडणारा ताम्हिणी घाट (Tamhini Ghat)  देखील आता खचला आहे. सध्या दुरूस्तीच्या कामासाठी 5 ऑगस्ट पर्यंत ताम्हिणी घाट वाहतूकीकरिता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 ऑगस्टला सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक बंद असणार आहे. दरम्यान पुणे जिल्हाधिकार्‍यांकडून याबाबतची सूचना जारी केली आहे.

पुण्यामध्ये पडणार्‍या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात एका बाजूचा रस्ता खचला आहे. सध्या तेथे दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता अजून खचून काही दुर्घटना होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या महामार्गावर नियमित वाहतूक चालू ठेवणं धोकादायक असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरात मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफ च्या एका बाजूचा रस्ता खचला आहे. या दरडीमुळे आदरवाडी व डोंगरवाडी गावांना फटका बसल्याने सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी शुक्रवार 2  ऑगस्ट ते सोमवार 5 ऑगस्ट पर्यंत रस्ता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज! 

पुणे-कोकण दोन्ही घाट वाहतूकीसाठी बंद राहणार

पावसाच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होत असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना सर्रास होतात. झाडं पडणं, रस्ता खचणं आणि माती वाहून जाणं या घटना कायम होत असतात. पुण्यातून कोकणात जाण्यासाठी वरंधा आणि ताम्हिणी घाट आहे. मात्र वरंधा घाटामध्ये दरड कोसळण्याचा धोका अधिक आहे. त्याच्या तुलनेत ताम्हिणी घाट सुरक्षित आहे. परंतू आयएमडी कडून सध्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने वरंधा घाट 30 सप्टेंबर पर्यंत बंद आहे. त्यामध्ये आता दुरूस्ती साठी ताम्हिणी घाट देखील बंद करण्यात आला आहे.

पावसाच्या दिवसात ताम्हिणी घाटात लॉंग़ ड्राईव्ह करत निसर्गाचं खुललेलं रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते.