Supriya Sule On Air Pollution: शासन म्हणजे केवळ सत्तेत राहणे आणि हेलिकॉप्टरमध्ये बसणे नव्हे: सुप्रिया सुळे
हे अशाच पद्धतीने चालले तर भविष्यात मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. राज्य सरकाने यावर तातडीने कृती करण्याची आवश्यकता आहे. विकास करावा पण तो शास्त्रीय पद्धतीन केलेला असावा. त्यासाठी शासन प्रशासनाने काम करणे गरजेचे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
मुंबई आणि काही प्रमाणात पुणे शहरात झालेले वायू प्रदूषण (Air Pollution) आणि खालावलेली हवेची गुणवत्ता यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. हवेची खालावलेली गुणवत्ता ही प्रचंड चिंताजनक आहे. हे अशाच पद्धतीने चालले तर भविष्यात मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. राज्य सरकाने यावर तातडीने कृती करण्याची आवश्यकता आहे. विकास करावा पण तो शास्त्रीय पद्धतीन केलेला असावा. त्यासाठी शासन प्रशासनाने काम करणे गरजेचे आहे. शासन म्हणजे केवळ हेलिकॉप्टरमध्ये बसणे आणि सत्तेत राहणे येवढेच नाही, असा टोलाही सुळे यांनी लगावला.
राज्यात ट्रीपल इंजिन सरकार आहे. पण हेच ट्रिपल इंजिन सरकार राज्याची सेवा करायला पूर्णपणे विसरले आहे. यातील एक खासगी विमान तर दर 15 दिवसांनी दिल्लीला धावते. अशा पद्धतीने विकास होत नसतो. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. परंतू , हा विकास होत असताना कळजी घेणे गरजेचे आहे. राज्यातील नागरिकांच्या आरोग्यावर, निसर्गावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. खास करुन भविष्यकालीन धोके आणि दीर्घकालीन परिणाम विचारात घेऊनच विकास करायला हवा. अशा विकासाला आमचा सदैव पाठिंबाच राहील, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. शहरामध्ये सकाळच्या वेळी दाट धुके पाहायला मिळत आहे. नागरिकांना श्वसनाचे आणि घशाचे आजार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जात असताना सुप्रिया सुळे यांनी केलेली टीका आणि वक्तव्य अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. खास करुन सार्वजनिक आणि खासगी बांधकाम ठेकेदारांना पालिकेने नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये बांधकाम करत असताना उडणारी धूळ नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासंबंदी सूचना करण्यात आल्या आहेत.
व्हिडिओ
उल्लेखनीय असे की, केवळ मुंबईच नव्हे तर राजधानी दिल्ली शहरातही हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. मानवी आरोग्यास घातक पातळी ओलांडून ही गुणवत्ता आणखी पुढे गेली आहे. परिणामीत तातडीचा आणि खबदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येणार नाही. कारम त्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन दिल्याचे, दिल्लीच्या शिक्षणमंत्री अतिशा यांनी म्हटले आहे. राजधानी दिल्ली आणि मुंबई शहरातील हवेच्या गुणवत्तेची पातळी विचारात घेता सुप्रिया सुळे यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.