Supriya Sule At Ghazipur Border : सुप्रिया सुळे गाझिपूर बॉर्डरवर दाखल; कृषी कायद्या विरोधात शेतकरी आंदोलनास पाठिंबा
या आधी शेतकरी आंदोलकांनी 2 फेब्रुवारीला शरद पवार यांच्याशी संवाद करुन आंदोलनाला पाठिंबा मागितला होता.
केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यास ( Farm Laws) शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर पाठीमागील दोन महिन्यांपासून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास महाविकासआघाडीने पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतीच शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यादेखील शेतकरी आंदोलकांची भेट (Supriya Sule At Ghazipur Border) घेण्यासाठी गाझीपूर बॉर्डर ( Ghazipur Border) येथे पोहोचल्या आहेत. या आधी शेतकरी आंदोलकांनी 2 फेब्रुवारीला शरद पवार यांच्याशी संवाद करुन आंदोलनाला पाठिंबा मागितला होता.
दरम्यान, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर बॉर्डरवर जाण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, मी शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकऱ्यासोबत केंद्र सरकार ज्या पद्धतीने वर्तन करत आहे. ते व्यथित करणारे आहे. अन्नदाता सुखी भव अशी मराठीत म्हण आहे. परंतू, आज हा अन्नदाताच आंदोलन करतो आहे. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, शेतकऱ्यांशी संवाद करुन लवकरात लवकर त्यांच्याशी चर्चा करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. (हेही वाचा, Farmers' Protest: शेतकरी आंदोलनाविषयी भाष्य केलेल्या परदेशी सेलेब्जना अमित शाह यांचे उत्तर- 'कोणताही प्रोपोगांडा भारताच्या ऐक्याला अडथळा आणू शकत नाही')
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही शेतकरी आंदोलनास भेट दिली होती. तसेच भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्याशी संजय राऊत यांनी संवाद साधला. संजय राऊत यांनी या वेळी शिवसेना शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे. तसेच, केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यास आमचा विरोध असल्याचेही राऊत यांनी म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संजय राऊत आणि इतर काही शिवसेना नेते दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर असलेल्या गाझीपुर बॉर्डरवर पोहोचले. शिवसेना ही पहिल्या दिवसांपासून कृषी कायद्याचा विरोध करते आहे. तसेच, शेतकरी आंदोलनाचे समर्थन करत असल्याचे म्हटले होते.