गोंदिया: दहावीचा पेपर देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या
अतुल तरोणे (17) असे या हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.
दहावीचा पेपर देऊन घरी परतत असणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करुन त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना गोदिंया (Gondia) येथून समोर येत आहे. अतुल तरोणे (17) असे या हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. काल (3 मार्च) रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास पेपर देऊन घरी परतत असताना हा प्रकार घडला. गोंदिया तालुक्यातील मोरवाही येथे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहावीचा पेपर देण्यासाठी गेलेला अतुल घरी परतत असताना त्याच्या घरापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर असलेल्या शेतात त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्यावर, शरीरावर अनेक ठिकाणी चाकुने वार करण्यात आले. इतंकच नाही तर त्याची जीभही कापण्यात आली. हल्ल्यानंतर त्याला गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. सायंकाळी 7 वाजता त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाची तपासणी करण्यासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात मृतदेह ठेवण्यात आला आहे. (गोंदिया: भरधाव कारच्या धडकेत 10 वी च्या परीक्षेसाठी निघालेल्या एका विद्यार्थीनीचा मृत्यू तर दोघीजणी जखमी)
पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे बोलले जात असले तरी अद्याप हत्येचे खरे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.
कालपासूनच राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारी ही दुसरी घटना गोंदियातून समोर येत आहे. यापूर्वी परीक्षेला जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यींनीना भरधाव कारने उडवल्याची घटना समोर आली होती. त्यात एकीला आपले प्राण गमवावे लागले तर दोघीजणी जखमी झाल्या आहेत.