Sion Station Bridge दोन वर्षांसाठी 28 मार्चपासून राहणार बंद
सायन स्टेशनचा (Sion Station) ब्रिटीश कालीन रेल्वेचा पूल पुर्नबांधणीच्या कामासाठी 28 मार्च पासून बंद करण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी हा पूल बंद राहणार आहे. मार्च 27-28 च्या रात्री हा पूल बंद होणार आहे.पहिल्यांदा हा पूल 20 जानेवारीला बंद करून तोडकाम सुरू केले जाणार होते. मात्र स्थानिकांच्या मागणीवरून खासदार राहुल शेवाळे यांनी ते काम थांबवले. नंतर 28 फेब्रुवारीची तारीख ठरली. मात्र पूल बंद झाल्याने ऐनवेळेस 10वी-12वी च्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते या कारणास्तव हे पाडकाम पुढे ढकलण्यात आले होते. बारावीची परीक्षा 19 मार्च आणि दहावीची परीक्षा 26 मार्चला संपणार आहेत. त्यामुळे आता 28 मार्च पासून सायनचा धारावी मार्गे वांद्रे पूर्व ला जाण्यासाठी रस्ता बंद केला जाणार आहे. काम वेळेत पूर्ण झाल्यास जानेवारी 2026 पर्यंत पुन्हा नवा पूल नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे.
रेल्वेचा जूना जीर्ण अवस्थेत आला असल्याने आणि मध्य रेल्वेला 5व्या, 6 व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी जागा हवी असल्याने हा पूल पाडला जात आहे. पुलाचा सध्याचा स्पॅन 27 मीटर आहे, एक पिलर 13 मीटर आणि दुसरा 14 मीटर आहे. नवीन पुलाचा एकच स्पॅन 52 मीटर असेल, त्यामुळे ट्रॅक टाकण्याचे काम करण्यासाठी पुरेशी जागा मोकळी होईल. आयआयटी मुंबई कडून शहरातील जुन्या पुलांचा आढावा घेतला होता. त्यानंतर या अहवालात सायनच्या पूलामध्ये स्टील गर्डर, आरसीसी स्लॅब धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते त्यामुळे आता हा पूल नव्याने बांधला जात आहे. सोबतच सीएसएमटी आणि कुर्ला स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईन टाकण्यासाठी अधिक जागा मिळावी यासाठी ब्रिटीशकालीन ROB ची पुनर्बांधणी केली जात आहे.
सायन स्टेशनचा पूल बंद झाल्याने या मार्गावरून पश्चिम उपनगरामध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सायन हॉस्पिटलच्या बाजूने धारावी मार्गे वांद्रे येथे जाण्यासाठी पर्यायी मार्गे वाहतूक वळवली जाणार आहे. तसेच ठाणे उपनगरामधून पश्चिम उपनगरात येणार्यांनी बीकेसी कनेक्टरचा पर्याय वापरण्याचे आवाहन आहे.