सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ: कणकवली ते सावंतवाडी चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या मतदारसंघातील काही महत्वाच्या लढती आणि मागील वर्षीचे निकाल जाणून घेऊयात..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ (Photo Credits: File Image)

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा हा राजकीय दृष्टीने बराच महत्वाचा भाग आहे. किंबहुना म्ह्णूनच महाजानदेश यात्रा, जनाशीर्वाद यात्रा तसेच विविध प्रचारसभा घेऊन हा किल्ला शाबूत ठेवण्यासाठी युतीची धडपड सुरु आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2019)  रणधुमाळीत विविध दिग्गज मंडळींनी  भाजपा (BJP), शिवसेना (Shivsena) यांच्याकडे पावले वळवली होती, अशाच प्रकारे सिंधुदुर्गातील महत्वाचे नेते म्हणजे नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील अलीकडे आपली दोन्ही मुले नितेश (Nitesh Rane) व निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासोबत भाजपात प्रवेश घेतला आहे. परिणामी या जिल्ह्यातील युतीचा पगडा आणखीनच भारी झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारसंघांवर एक नजर टाकुयात..

महाराष्ट्रातील एकूण 288 मतदारसंघांपैकी अवघे तीन मतदारसंघ सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात, यामध्ये कणकवली, सावंतवाडी आणि कुडाळ या तीन ठिकाणांचा समावेश आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या मतदारसंघातील काही महत्वाच्या लढती आणि मागील वर्षीचे निकाल जाणून घेऊयात..

कणकवली विधानसभा मतदारसंघ

यंदाच्या निवडणुकीत शिवसेना- भाजपा अशी युती असली तरी काही निवडक ठिकाणी सेनेने भाजपाच्या विरोधात देखील आपले उमेदवार उभे केले आहेत, त्यातीलच एक ठिकाण म्हणजे कणकवली मतदारसंघ. यापूर्वी 2009 मध्ये याठिकाणी केवळ 25 मतांच्या फरकाने भाजपाचे उमेदवार प्रमोद जठार निवडून आले होते तर 2014 मध्ये काँग्रेस कडून नितेश राणे यांनी 25 हजाराहून मताधिक्याने बाजी मारली होती, पण यंदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर राणे कुटुंबातील नेते मंडळींनी भाजपाचे कास धरली. परिणामी यंदा नितेश राणे हे या मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. तर सेनेकडून यंदा या ठिकाणी सतीश सावंत, काँग्रेसकडून सतीश राणे आणि मनसे कडून राजन दाभोळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. यंदा कणकवली मध्ये चौफेर लढत पाहायला मिळणार आहे.

कुडाळ विधानसभा मतदारसंघ

2009 साली झालेल्या विधानसभेला नारायण राणे यांनी कुडाळकरांची सर्वाधिक मते मिळवली होती. पण 2014 ला शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी तब्बल 10 हजारांच्या मतधिकायने राणे यांचा पराभव केला. हि बाब लक्षात घेत यंदा याठिकाणी विद्यमान आमदार वैभव नाईक यांनाच पुन्हा एकदा सेनेतर्फे तिकीट मिळाले आहे. तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चेतन मोंडकर आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे रणजित देसाई उभे आहेत. कुडाळ मधील एकंदरीतच मतदानाचा टक्का हा 70 %च्या आत आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ

दीपक केसरकर हे मागील दोन विधानसभा निवडणुकांपासून सावंतवाडीचे आमदार आहेत फरक इतकाच की 2009 साली त्यांनी राष्ट्रवादीच्या तर 2014 साली शिवसनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यंदा सुद्धा दीपक यांना सेनेकडून तिकीट मिळाले आहे. केसरकर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीकडून बबन साळगावकर, मनसे कडून प्रकाश रेडकर आणि अपक्ष म्हणून राजन तेली असे उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

दरम्यान सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.