बीड जिल्ह्यात शिवसेना युवा प्रमुख राहुल फरताळे यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला

त्यांच्यावर शहरातील सारडा नगरी परिसरात गुरुवारी (16 जानेवारी) तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

Rahul Fartale (Photo Credits: Facebook)

बीड जिल्ह्यातील शिवसेना युवा प्रमुख राहुल फरताळे यांच्यावर दिवसा ढवळ्या हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर शहरातील सारडा नगरी परिसरात गुरुवारी (16 जानेवारी) तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान या हल्ल्याचं कारण एक जुना वाद असल्याचे सांगितलं जात आहे. हा हल्ला झाल्यानंतर लगेचच राहुल फरताळे यांनी घटनास्थळावरुन पळ काढला आणि म्हणूनच थोडक्यात त्यांचं जीव बचावला आहे असं टीव्ही 9 मराठी ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

शिवसेना युवा प्रमुख राहुल फरताळे हे आज त्यांच्या घराकडून शहरात जात असताना, सावता माळी चौकाच्यापुढे पोहोचल्यावर, दुचाकीवर दोन हल्लेखोर आले. त्यांनी फरताळे यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि मग त्यांच्यावर तलवार आणि कुकरी या साहित्याने वार केले.

ही संपूर्ण घटना अवघ्या काही क्षणांत घडल्याने नेमकं काय घडतंय हे फरताळे यांना कळायच्या आताच हल्लेखोर पळूनसुद्धा गेले. राहुल यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. लगेचच घटनास्थळी जमलेल्या लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, खंडू जगताप आणि दादाराव जगताप असे या दोन हल्लेखोरांची नावे आहेत. काही वर्षांपूर्वी जगताप आणि फरताळे यांच्यात वाद झाल्याने, सूडाच्या भावनेतून हा हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Satara Bandh: उदयनराजे भोसले- संजय राऊत वाद पेटला; छत्रपतींच्या गादीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज सातारा बंद!

दरम्यान, या प्राणघातक हल्ल्यात राहुल फरताळे हे गंभीर जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. आता  राहुल यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत आणि शहर पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.