Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत काट्याची टक्कर; शिवसेना नेतृत्वाची खास रणनिती, आमदारांवर शिवसैनिकांची करडी नजर

जवळपास वीस वर्षांनी प्रथमच राज्यसभा निवडणूक लागली आहे. त्यातही एकेकाळचे मित्रपक्ष आणि सुमारे 25 वर्षे सत्तेत राहिलेले सहकारी असे शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप आमनेसामने आहेत. सहाव्या उमेदवारासाठी ही टक्कर होत आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: CMO)

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) निमित्ताने शह-काटशह आणि फोडोफोडीचे राजकारण गृहीत धरुन सावध पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास वीस वर्षांनी प्रथमच राज्यसभा निवडणूक लागली आहे. त्यातही एकेकाळचे मित्रपक्ष आणि सुमारे 25 वर्षे सत्तेत राहिलेले सहकारी असे शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप आमनेसामने आहेत. सहाव्या उमेदवारासाठी ही टक्कर होत आहे. दोन्ही बाजूंना केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच मतांचती आवश्यकता आहे. त्यामुळे एक एक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे काही झाले तरी ही जागा जिंकायचीच असा निश्चय करुन शिवसेना नेतृत्व (CM Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहे. त्यासाठी शिवसेना नेतृत्वाने खास रणनिती तयार केली असल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेने आपल्या आमदारांंना हॉटेलवर बोलावले आहे. त्यांच्यावर शिवसैनिकांची करडी नजर असणार आहे. तत्पूर्वी शिवसेना आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करतील. तसेच, आपला उमेदवार जिंकूण येण्यासारखी स्थिती कशी आहे हेसुद्धा ते पटवून देणार आहेत. त्यानंतर हे सर्व आमदार हॉटेलवर जातील. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणूक अटळ; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, शिवसेना, भाजप, काँग्रेस नेत्यांकडून दणादण प्रतिक्रिया)

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल

सत्ताधारी महाविकास आघाडी

शिवसेना - 55

राष्ट्रवादी - 53

काँग्रेस - 44

बहुजन विकास आघाडी - 3

समाजवादी पार्टी - 2

प्रहार जनशक्ती पार्टी - 2

माकप - 1

शेकाप - 1

स्वाभिमानी पक्ष - 1

क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1

अपक्ष - 9

एकूण - 172

विरोधी पक्षाचे संख्याबळ

भाजप - 106

जनसुराज्य शक्ती - 1

राष्ट्रीय समाज पक्ष - 1

अपक्ष - 4

दरम्यान, असेही समजत आहे की, आमदारांवर करडी नजर ठेवण्यासाठी शिवसैनिकांच्या विविध टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत. या टीम हॉटेलच्या चारही बाजूला असतील. हे शिवसैनिक हॉटेलवर येणाजाणाऱ्यांवर बारीक नजर ठेऊन असतील. दररोज सकाळी प्रत्येक आमदाराची स्वाक्षरी कागदावर घेतली जाईल. त्यानंतर त्या आमदारांना पुन्हा हॉटेल ट्रायडंट येथे ठेवण्यात येईल. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकासाघाडीच्या सर्व आमदारांची एक बैठक घेतील असेही समजते.