बिहार मध्ये जनतेने झिडकारल्यावर मुख्यमंत्री पदी नितीश कुमारांना लादणे हा लोकमताचा अवमान; शिवसेनेची सामनाच्या अग्रलेखातून टीका
आज सामनाच्या अग्रलेखामध्ये भाजपा-जेडीयूवर टीका करताना पुन्हा तेजस्वी यादवचं कौतुक करण्यात आलं आहे.
बिहार निवडणूकीचे निकाल लागून आता 2 दिवस झाले आहेत. दरम्यान एनडीएला बिहारमध्ये पुन्हा सत्ता मिळाली असली तरीही तेथे जेडीयू आणि नीतीश कुमारांची मोठी पिछेहाट झाली आहे. तिसर्या स्थानी फेकल्या गेलेल्या नीतीश कुमाराशांच्या जेडीयूला आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. दरम्यान हा सल्ला काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी दिल्यानंतर आज पुन्हा सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर तोफ डागताना जनतेने झिडकारल्यानंतर मुख्यमंत्रीपदी नीतीश कुमार यांना लादणं म्हणजे लोकमताचा अवमान असल्याचं म्हटलं आहे. आज सामनाच्या अग्रलेखामध्ये भाजपा-जेडीयूवर टीका करताना पुन्हा तेजस्वी यादवचं कौतुक करण्यात आलं आहे.
बिहार मध्ये भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या भिन्न टोकांच्या पक्षाला जनमत मिळालं आहे. यामध्ये नीतीश कुमार व त्यांचा पक्ष कोठेच नाही. अशावेळी त्यांनी तिसर्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या जेडीयूचा मुख्यमंत्री करणं ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीची दारूण शोकांतिका ठरेल असे म्हणत हा प्रकार म्हणजे हरलेल्या पेहलवानास विजयाचं पदक देण्यासारखा प्रकार आहे. Bihar Election Results 2020: बिहार निवडणूक निकालावर संंजय राऊत यांची प्रतिक्रिया- 'नीतीश कुमार मुख्यमंत्री झालात तर शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत'; तेजस्वी मॅन ऑफ द मॅच.
दरम्यान बिहार मध्ये भाजप- जेडीयूची युती होती आणि पुढेही राहील. निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी नीतीश कुमारांनाच त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार सांगितला होता. मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपाकडे त्यांच्या तुलनेत अधिक जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे जेडीयू चा देखील बिहार मध्ये 'गेम' झाला का? अशी चर्चा देखील केली जात आहे. चिराग पासवान हा नीतीश कुमारांविरूद्ध विषारी प्रचार करत होता. भाजपाने त्याला रोखलं नाही. त्याच्यामुळे 20 जेडीयूच्या जागा गेल्या.
भाजप-जेडीयूने सत्ता राखली तरी त्यांना एकाकी झुंज दिलेल्या राजदच्या तेजस्वी यादवचं देखील कौतुक होत आहे. तेजस्वी 31 वर्षांचा उमदा नेता आहे. त्याच्या रूपाने बिहारलाच नव्हे तर देशाला एक तरूण नेता मिळाला आहे. बिहारमध्ये तेजस्वी सत्ता पालट करण्यात जिंकला नसला तरीही त्याने पाठ देखील टेकवली नाही. त्याच्या संघर्षाची नक्कीच राजकीय इतिहासात नोंद होईल. असे देखील सामन्याच्या अग्रलेखात आज नमूद केले आहे.