Shiv Sena On Saamana: डोनाल्ड ट्रम्प यांची भलामण केली याचे दु:ख होतच असेल!; शिवसेनेचा पंतप्रधान मोदी यांना टोला

पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल!,” असं म्हणत शिवसेनेनं टोला लगावला आहे.

Donald Trump, Prime Minister Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हस्तांतरीत करताना मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊसमध्ये जो काही धुमाकूळ घातला त्याची जगभरात चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनीही घडल्या प्रकाराचा निषेध केला. याच मुद्द्यावरुन शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दैनिक सामना (Saamana Editorial) संपादकीयातून पंतप्रधान मोदी यांनी टोला लगावण्यात आला आहे. 'अमेरिकेच्या संसदेत जे घडले ते जगात कोणत्याही देशात घडू नये. पंतप्रधान मोदी यांनी आता ट्रम्प यांचा निषेध केला. मात्र याआधी ट्रम्पची भलामण केली याचेही दुःख त्यांना होतच असेल!', असे शिवसेनेने म्हटले आहे.

सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे

दरम्यान, ट्रम्प यांचे वर्तन व बोलणे हे सुसंस्कृत माणसासारखे कधीच नव्हते. त्यांचा सार्वजनिक वावर हा शिसारी आणणाराच होता. अशा माणसासाठी मोदी सरकारने अहमदाबादेत लाल गालिचे अंथरले होते. हा समस्त गुजराती बांधवांचा, गांधी, सरदार पटेलांचाच अपमान आहे. बरे झाले, या दळभद्री ट्रम्पचे पाय आपल्या शिवरायांच्या महाराष्ट्रास लागले नाहीत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांनी गुजरातेत नेऊन मिरवले. त्या चिनी राष्ट्राध्यक्षाने आता लडाखमध्ये त्यांचे सैन्य घुसवले. ट्रम्प यांना अहमदाबादेत नेले, त्यांनी येताना कोरोना आणला व आता लोकशाहीची सरळ हत्याच केली. आमचे परराष्ट्र धोरण हे प्रवाहपतित होत आहे, असाही निशाणा शिवसेना संपादकीयातून साधण्यात आला आहे.