जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या, 'सामना' च्या अग्रलेखातून शिवसेनेचा पंतप्रधानांना टोला
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या 90 मिनिटांच्या भाषणात ते कोणत्या मुद्यांवर बोलले आणि कोणत्या मुद्द्यांवर बोलायला पाहिजे होते यावर सामनाच्या अग्रलेखातून (Saamna Editorial) शिवसेनेने सडकून टिका केली आहे.
भारताच्या स्वातंत्र्य दिनी (India Independence Day) म्हणजेच 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावर (Red Fort) ध्वजारोहण केले आणि राष्ट्राला संबोधित करत भाषण दिले. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या 90 मिनिटांच्या भाषणात ते कोणत्या मुद्यांवर बोलले आणि कोणत्या मुद्द्यांवर बोलायला पाहिजे होते यावर सामनाच्या अग्रलेखातून (Saamna Editorial) शिवसेनेने सडकून टिका केली आहे. जगाचे राहू द्या, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. 'आजच्या कोरोना महामारीने देशासमोर जे आर्थिक महासंकट उभे राहिले आहे त्याचे काय? फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तत्काळ सुटेल असे वाटत नाही. आतापर्यंत देशात 14 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. भविष्यात हा आकडा वाढेल. लोकांना घराबाहेर पडायचे आहे; पण घराबाहेर पडून काय करायचे?' असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
पाहा काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात:
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून लाल किल्ल्यावरून जे भाषण केले ते त्याच पद्धतीचे होते. पाकिस्तान किंवा चीनला त्यांचे नाव न घेता इशारे वगैरे देण्याचे सोपस्कार त्यांनी पार पाडले. ते नित्याचेच क्रियाकर्म आहे. चीन अद्यापि आपल्या भूमीत घुसलेलाच आहे. पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. जम्मू-कश्मिरात जवानांची बलिदाने आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. पंतप्रधानांचे भाषण सर्वसमावेशक होते. कोरोनामुळे समोर गर्दी कमी होती. त्यामुळे प्रमुख मंडळींच्या चेहऱयावरचे भाव ‘मास्क’मुळे समजणे कठीण होते; पण पंतप्रधानांचा आवेश, जोश कमी झाला नव्हता.” अशी टीका शिवसेनेनं केली.Independence Day 2020: 'आत्मनिर्भर भारत हा 130 कोटी भारतीयांचा मंत्र बनला आहे'; स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाल किल्ल्यावरुन देशावासियांशी संवाद
पंतप्रधानांनी ९० मिनिटे म्हणजे दीड तास भाषण केले. आम्हाला आव्हान देणाऱ्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास आपला देश सक्षम आहे. हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहणाऱयांना, देशाच्या अखंडतेवर प्रहार करू पाहणाऱयांना ‘एलओसी’ ते ‘एलएसी’ असे हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले व स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून सांगितले म्हणजे त्यावर विश्वास ठेवायलाच हवा. दुश्मनांचे वाकडे डोळे बाहेर काढण्यासाठी सैन्य, हवाई दल वगैरे आहे; पण देशात जे भूकमरी व बेरोजगारीचे संकट तसेच आर्थिक मंदीचा राक्षस धुमाकूळ घालतो आहे त्याच्याशी मुकाबला कसा करणार? हे संकट आजही घरात निपचीत पडून आहे. ते उपाशी पोटाची आग घेऊन घराबाहेर पडेल तेव्हा या स्वदेशी संकटाचा सामना करण्यासाठी सैन्य बोलवावे लागेल अशी चिंता आम्हाला सतावत आहे. कोट्यवधी चुली विझताना दिसत आहेत, त्याच वेळी घराघरात भुकेचा आगडोंब उसळताना दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानात असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवताना व्यक्त केले. जगाचे राहू द्या साहेब, देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या. स्वातंत्र्य दिन येतो व जातो, लाल किल्ला तोच आहे, प्रश्न आणि दुःख तेच आहे,” असा टोला शिवसेनेनं पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 2020 09:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

