Privilege Motion of Shiv Sena MLA Pratap Sarnaik: कंगना रनौत आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून हक्कभंग प्रस्ताव
तसेच, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वत: ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली
शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव (Privilege Motion) दाखल केला आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्धही सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी स्वत: ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2020 (Maharashtra Legislature Winter Session 2020 आजपासून सुरु झाले. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या वेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, काही लोकांनी माझ्या विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार केला. खोट्या बातम्या परसवल्या. ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची राज्य आणि देशपातळीवर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. काही लोकांनी तर माझ्या घरी इडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सापडल्याचा दावा केला. राफेलचे कागदपत्रं मिळाले, ट्रम्प यांच्यासोबत भागिदारी आणि काहींनी विदेशात निर्माण केलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज सापडल्याचे म्हटले. परंतू, हे सर्व धादांत खोटे आहे, असे म्हणत आपल्यावरील सर्व आरोप प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावले. (हेही वाचा, Maharashtra Legislature Winter Session 2020: महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु, मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी ठरणार कळीचे मुद्दे)
पाकिस्तानसारख्या देशाचे स्वत:चेच जगात क्रेडीट नाही त्या देशाचे क्रेडीट कार्ड घेऊन मी काय करणार? असा सवालही उपस्थित केला. दरम्यान, कंगना रनौत यांनी केलेल्या ट्वीटच्या आधारे काही प्रसारमाध्यमांनी माझ्याबद्दल दिशाभूल करणारे वृत्त दिले. त्यांच्याबाबतही माझा हक्कभंग प्रस्ताव दाखल करुन घ्यावा, अशी विनंती आपण अध्यक्षांना केल्याचे सरनाईक म्हणाले.
दरम्यान, ईडीच्या चौकशीला मी सामोरा गेलो आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना मी योग्य उत्तरे दिली आहेत. या पुढेही काही चौकशीसाठी आवश्यक असेल तर मला कळवा. प्रताप सरनाईक दोन तासात ईडी कार्यालयात दाखल होईल, असे आपण ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचेही प्रताप सरनाईक म्हणाले.