Farmers Protest: खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेना खासदारांचं शिष्टमंडळ गाझीपूर बॉर्डर वर राकेश टिकैत यांच्या भेटीला
या भेटीमध्ये राकेश टिकैत यांची भेट घेऊन संजय राऊत यांनी शिवसेनेचा शेतकरी आंदोलनाला असलेला पाठिंबा दर्शवला आहे
दिल्ली- उत्तर प्रदेश गाझीपूर बॉर्डर वर आंदोलन करत असलेल्यांना शेतकर्यांच्या भेटीला आज (2 फेब्रुवारी) संजय राऊत यांच्यासह शिवसेना खासदारांचं एक शिष्टमंडळ पोहचलं होतं. या भेटीमध्ये राकेश टिकैत यांची भेट घेऊन संजय राऊत यांनी शिवसेनेचा शेतकरी आंदोलनाला असलेला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान यावेळी मीडीयाशी बोलताना संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ' शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आम्ही आज राकेश टिकैत यांना भेटून आमचा पाठिंबा दर्शवण्यासाठी आलो आहोत असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी संसदेमधील लढाई तेथे पण आज आम्ही थेट युद्ध भूमीत येऊन आमचा पाठिंबा शेतकर्यांना दर्शवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. Farmers Protest: शेतकरी आंदोलनात फूट; VM Singh, Bhanu संघटनेची आंदोलनातून तात्काळ माघार घेत असल्याची घोषणा.
दरम्यान यावेळेस त्यांनी ही वेळ शेतकर्यांचा उत्साह वाढवण्याची आहे त्यामुळे यापूर्वी केवळ फोनवर बोलणं होत आहे मात्र आता शेतकर्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यावेळेस सिंधू बॉर्डर वर रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आल्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना जर हे चीनच्या सीमेवर ठोकले असते तर त्यांची भारतात घुसण्याची हिंमत झाली नसती असं म्हणत केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारने शेतकर्यांशी नीट बोलावं, अहंकाराने देश चालवू शकत नाही.असे नमूद केले आहे.
ANI Tweet
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
गाझीपूर बॉर्डरवर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत अन्य खासदारांमध्ये अनिल देसाई, अरविंद सावंत, राजन विचारे यांचादेखील समावेश होता. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आझाद मैदानात जमलेल्या शेतकर्यांच्या मोर्च्यामध्ये शिवसेना नेते अनुपस्थित होते. त्यामुळे काही काळ शिवसेनेच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला होता पण आज शिवसेनेने थेट राकेश टिकैत यांचं मनोबल वाढवण्यासाठी गाझीपूर बॉर्डरवर त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राकेश टिकैत यांनी मात्र सध्या प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.