Shiv Sena Foundation Day: शिवसेनेच्या स्थापना दिनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा भिडणार; उद्या मुंबईमध्ये दोन ठिकाणी साजरा होणार कार्यक्रम

यंदा शिवसेनेचा स्थापना दिवस मुंबईत दोन ठिकाणी साजरा होत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने 19 जून रोजी मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा करण्याची तयारी केली आहे.

Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

Shiv Sena Foundation Day: शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर आजपर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील प्रमुख नेत्यांची एकही मोठी बैठक झालेली नाही. आता पक्षाच्या स्थापना दिनाच्या एक दिवस आधी उद्धव गटाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आणि भाजपसोबत सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शिवसेनेची (यूबीटी) मेगा बैठक होणार आहे. बराच विचार केल्यानंतर ही सभा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी येथे होणार असल्याचे ठरले आहे. उद्या म्हणजेच, 19 जून रोजी शिवसेनेचा स्थापना दिवस (Shiv Sena Foundation Day) आहे. यंदा शिवसेनेचा स्थापना दिवस मुंबईत दोन ठिकाणी साजरा होत आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने 19 जून रोजी मुंबईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा करण्याची तयारी केली आहे. आजच्या बैठकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, ही खरोखरच मोठी बैठक आहे, जी दिवसभर चालणार आहे. महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागातून पक्षाचे पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत. एकनाथ शिंदे सरकार कसे पाडायचे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही सोमवारी शिवसेनेचा स्थापना दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याच्या तयारीत आहेत. दोघेही मुंबईत कार्यक्रम आयोजित करणार आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेस्को मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे, जे गोरेगाव येथे आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट मुंबईतील सायन येथील सन्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली होती. त्यानंतर आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला होता. नंतर दोघेही निवडणूक आयोगाकडे गेले. (हेही वाचा: मेडिकल कॉलेज बांधण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बळजबरीने सैनिकांची जमीन बळकावली; संजय राऊत यांचा आरोप)

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच खरी ठरवून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही दिले. तर ठाकरे गटाचे नाव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निश्चित करून त्यांना  मशाल हे निवडणूक चिन्ह म्हणून देण्यात आले. याआधी दसरा मेळावाही दोन्ही पक्षांनी स्वतंत्र साजरा केला होता, आता शिवसेनेचा स्थापना दिवसही दोन ठिकाणी साजरा होणार आहे.