Shiv Sena Dusshera Melava 2022: 'बीकेसी येथील मेळावा हा हिंदुत्वाचा खरा मेळावा असेल'- एकनाथ शिंदे गटाचे आमदार
म्हस्के पुढे म्हणाले, ‘हिंदुत्व बळकट करण्यासाठी दसरा मेळावा आयोजित केला जातो, मात्र उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून हिंदुत्व विसरले आहेत.'
मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे (Uddhav Thckeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (Shivsena) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dussehra Rally) आयोजित करण्याची परवानगी दिल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर होणारा मेळावा, हाच खरा हिंदुत्वाचा मेळावा असेल असा दावा शिंदे गटाने केला आहे. एका परिषदेदरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले की, ‘शिवाजी पार्कवर होणारा उद्धव ठाकरे यांचा मेळावा हा हिंदुत्वावर होणार नाही, ते फक्त इतरांना दोष देण्याचे व्यासपीठ असेल.’
म्हस्के पुढे म्हणाले, ‘हिंदुत्व बळकट करण्यासाठी दसरा मेळावा आयोजित केला जातो, मात्र उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून हिंदुत्व विसरले असून, शिवाजी पार्कवर हिंदुत्वाबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. बीकेसी येथील मेळाव्यामध्ये पक्षाचे सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील.’
दुसरीकडे, एका पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, टेंभी नाका येथे शिकार मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. आनंद दिघे यांनी सुरू केलेला ठाण्यातील टेंभी नाका नवरात्रोत्सव हा शहरातील प्रसिद्ध नवरात्रोत्सव उत्सवांपैकी एक आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी ही प्रतिकृती साकारली आहे. (हेही वाचा: Raj Thackeray On PFI: भारतात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यास हिंदू शांत बसणार नाहीत, राज ठाकरेंचे गृहमंत्र्यांना पत्र)
शिंदे म्हणाले, ‘देशभरातून नागरिक या उत्सवाला भेट देतात. ही परंपरा पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. मागील सरकारच्या काळात सणांवर बंधने आली होती, मात्र सध्याच्या सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. लोकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय मोठ्या थाटामाटात साजरे झाले आणि आता नवरात्रोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.