महाराष्ट्र: सलग सुट्ट्या आल्याने कोल्हापूर, शिर्डी, जेजुरी सारख्या देवस्थळांवर भाविकांची अलोट गर्दी
यावेळी कोरोनाचे नियम अगदीच धाब्यावर बसलेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यंदा 26 जानेवारीला मंगळवार आला असून या दिवशी बँक हॉलिडे असल्याने लोक आधीच्या आठवड्यात शुक्रवारपासून (22 जानेवारी) सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे अनेकांचे पिकनिक, आउटिंग, ट्रेक्स आणि काहींचे देवदर्शनाचे प्लान्स ठरले आहेत. अनलॉकच्या टप्प्यात महाराष्ट्रातील मंदिर सुरु झाल्याने भाविक देखील आपल्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी आले आहेत. यामुळे शिर्डी (Shirdi), पंढरपूर (Pandharpur), कोल्हापूर (Kolhapur), जेजुरी (Jejuri) यांसारखी अनेक तीर्थक्षेत्रे ही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे. सलग सुट्ट्यांवर या तीर्थस्थळी भाविकांचा जनसमुदाय उसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी (24 जानेवारी) जेजुरीमध्ये 90,000 भाविकांनी खंडेरायाचे दर्शन घेतले अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. यावेळी कोरोनाचे नियम अगदीच धाब्यावर बसलेल्याचे चित्र पाहायला मिळाले.हेदेखील वाचा- Republic Day Parade 2021: यंदा भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन; परेड वेळ, ठिकाण यासह जाणून घ्या कुठे पाहाल Live
तर पंढरपूरातही विठ्ठलभक्तांची अशीच अलोट गर्दी पाहायला मिळाली. ऑनलाईन पासशिवायही येथे दर्शन घेता येत असल्याने भाविकांनी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. दूर-दूर वरुन आलेल्या भक्तांमुळे येथील, हॉटेल्स, लॉज देखील फुल होते. काल दिवसभरात 15 हजार भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.
पंढरपूरात वयाची अट कायम ठेवण्यात आली असून 65 वर्षांच्या आत असलेल्या भाविकांनी आपले वय स्पष्ट करणारे आधारकार्ड वा अन्य ओळखपत्र दाखवून विठुरायाचे दर्शन घेऊ शकतात. अशा भाविकांना ओळखपत्र दाखवून आत सोडण्यात येईल. कोरोनासंबंधीची काळजी म्हणून सोशल डिस्टंसिंग, मास्क लावणे, हात सॅनिटाईज करणे या नियमांचे पालन करणे मात्र अनिवार्य आहे. तसेच 65 वर्षांवरील व्यक्ती, 10 वर्षांखालील मुले, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी दर्शनासाठी येणे टाळावे असेही मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात देखील भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत जवळपास 15 हजार भाविकांनी दर्शन घेतले होते.