Sharad Pawar यांच्या पक्ष चिन्हाचं आज रायगडावर होणार अनावरण
शरद पवार यांच्यासह त्यांचे सारे नेते या पक्ष चिन्हाच्या लॉन्च साठी रायगडावर उपस्थित राहणार आहेत.
एनसीपी (NCP) मध्ये फूटीनंतर अजित पवारांकडे (Ajit Pawar) एनसीपीचं पक्षचिन्ह आणि नाव देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर आता आगामी निवडणूकांसाठी शरद पवार यांनी 'तुतारी' पक्षचिन्हं निवडलं आहे. या पक्षचिन्हाचं भव्य लॉन्चिंग आज किल्ले रायगड (Raigarh) येथून केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड ही राजधानी होती. तेथे आज शरद पवार गट शक्तिप्रदर्शन करत 'तुतारी' हे पक्षचिन्हं लॉन्च करणार आहे. शरद पवार गटाला आता नाव राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार असे देण्यात आले आहे. शरद पवार यांच्यासह त्यांचे सारे नेते या पक्ष चिन्हाच्या लॉन्च साठी रायगडावर उपस्थित राहणार आहेत.
एनसीपी मधील फूटीनंतर शरद पवारांच्या गटाला नाव मिळाले होते पण पक्षचिन्हाबाबत घोषणा झाली नव्हती. पक्षचिन्ह लवकरात लवकर मिळावे यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टाने निवडणूक आयोगाला सात दिवसांत पक्ष चिन्ह देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गुरुवारी तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह शरद पवार यांच्या पक्षाला जाहीर केले.
रोहित पवारांची प्रतिक्रिया
‘दिल्लीपुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकविलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय.’ अशी पोस्ट काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी केली होती. त्यामुळे नव्या पक्ष चिन्हासह आणि नावासह लोकांमध्ये आक्रमकपणे पोहचण्यासाठी आता शरद पवार गट सज्ज झाला आहे.
शरद पवार कुटुंबात पहिली राजकीय ठिणगी ही बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये पडलेली दिसली आहे. लोकसभेसाठी सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची चर्चा आहे. तर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी बोलताना आपल्याला कुटुंबात एकटं पाडलं गेल्याची भावना बोलून दाखवली आहे.