'त्या' भेटीनंतर पवार म्हणाले 'उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाच विरोध नाही'

उदयनराजे आणि शरद पवार (संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

उदयनराजेंच्या लोकसभा उमेदवारीला साताऱ्यातून कोणाचाही विरोध नाही. मात्र, अंतिम निर्णय खेळीमेळीच्या वातावरणात घेऊ, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांतून सुरु झालेल्या उलटसुलट चर्चेवर पडदा टाकला. शरद पवारांनी राजेंच्या उमेदवारीला कोणाचा विरोध नाही असे सांगितले असले तरी, त्यांच्या उमेदवारीबाबत कोणतेही भाष्य करणे टाळले आहे. त्यामुळे साताऱ्यातून राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला हा प्रश्न अद्यापही कायम आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील नेत्यांसोबत काल बैठक झाली. या बैठकीतही कोणी उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध केला नाही. मात्र, पत्रकारांनी कोणत्या आधारावर राजेंच्या उमेदवारीला विरोध असल्याच्या बातम्या दिल्या, हे समजू शकले नाही, असे पवार म्हणाले. पुढे बोलताना पवार यांनी पक्षनेत्यांसोबत दोन प्रकारच्या बैठका घेतल्याचे सांगितले. त्यापैकी एक लोकसभा निवडणुकीसंदर्भात होती तर, दुसरी विधानसभा निवडणुकीसंदर्भात असल्याचेही पवार म्हणाले.

साताऱ्यातून लोकसभेसाठी उदयनराजेंच्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांतर्गतच विरोध असल्याचे वृत्त होते. त्यातच विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी आणि त्यांच्या विरोधकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची वेगवेगळी भेट घेतली. त्यामुळे या चर्चेला अधिकच उधान आले होते.तसेच, पवारांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी 'फसवाफसवी करु नका, नाहीतर आपल्याला पण कळतं' असं आपल्या खास स्टाईलमध्ये स्टेटमेंट दिल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या.