सोन्याच्या मास्कमुळे पिंपरी चिंचवड मधील शंकर कुऱ्हाडे चर्चेत; साडेपाच तोळ्याच्या मास्कसाठी मोजले तब्बल 2 लाख 90 हजार
हौसेला मोल नाही म्हणतात ना ते अगदी खरं असल्याचं शंकर कुऱ्हाडे यांच्याकडे पाहून पटतं.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे सर्वसामान्यांमध्ये मास्कचे (Mask) महत्त्व वाढले. त्यामुळे आता बाहेर पडल्यानंतर सर्वांच्या तोंडावर मास्क दिसत आहे. कापडाचे, डिस्पोजेबल किंवा साधारण विविध रंगाचे मास्क तुम्ही पाहिले असतील. पण सोन्याचा मास्क कधी पाहिला आहे का? पिंपरी चिंचवडचे (Pimpri Chinchwad) शंकर कुऱ्हाडे (Shankar Kurhade) यांनी चक्क सोन्याचा मास्क (Gold Mask) बनवला आहे. हा मास्क साडे पाच तोळ्याचा असून यासाठी तब्बल 2 लाख 90 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. शंकर कुऱ्हाडे यांना सोन्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे पूर्वीपासूनच त्यांच्या पाचही बोटात सोन्याच्या अंगठ्या, मनगटात कडे, गळ्यात गोफ आहे. त्यात आता सोन्याच्या मास्कची ही भर पडली आहे. हौसेला मोल नाही म्हणतात ना ते अगदी खरं असल्याचं शंकर कुऱ्हाडे यांच्याकडे पाहून पटतं.
कोरोना व्हायरसच्या संकटात देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. तर अनेक ठिकाणी उपासमारी वेळ लोकांवर आली आहे. एकीकडे जागतिक संकटासह आर्थिक संकटाचा सामना देशातील जनतेला करावा लागत असताना शंकर यांच्या सोन्याच्या मास्क वरुन उलट सुलट चर्चा होत आहेत. त्यातच सोन्याचे भाव वाढल्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. मात्र त्यामुळे शंकर यांना काही फरक पडत नाही. ते म्हणतात चर्चा तर होणारच.
माझ्या वस्तीत मी 3 हजार कुटुंबांना चार वेळा धान्य वाटप केलं आहे. मास्क, साबण देखील वाटले. तसंच होमिओपॅथिकच्या गोळ्यांचे वाटपही केले. चार टप्प्यात केलेल्या या दानधर्मानंतरही उरलेल्या पैशांनी सोन्याचा मास्क बनवण्याची हौस पुरवली असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. काहीही असो मात्र सोन्याच्या मास्कमुळे पिंपरी चिंचवडचे शंकर कुऱ्हाडे चांगलेच चर्चेत आले आहेत.