Shakti Bill Update: महाराष्ट्रात आम्ही लवकरच शक्ती बिल आणत आहोत- अनिल देशमुख
अशा परिस्थितीत आरोपींवर कठोरातील कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरच अधिका-यांशी चर्चा करुन हा कायदा महाराष्ट्रात आणण्यात येईल.
महिला आणि बालिकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हैदराबादच्या दिशा अधिनियमावर शक्ती बिल (Shakti Bill) राज्यात लवकरात लवकर आणण्यासाठी कंबर कसली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज्यात लवकरच शक्ती बिल आणणार असल्याचे सांगितले आहे. महिला आणि बालिकांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस गंभीर रुप घेत आहेत. अशा परिस्थितीत आरोपींवर कठोरातील कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरच अधिका-यांशी चर्चा करुन हा कायदा महाराष्ट्रात आणण्यात येईल.
शक्ति बिलासंदर्भात नेमण्यात आलेली समिती आज नागपुरात आली. त्यानंतर लवकरच ती औरंगाबाद आणि मुंबईला जाईल. त्यानंतर आम्ही महिला संघटनांशी बोलून त्यांची मतं आणि सूचनांचा देखील विचार करु. त्याचबरोबर वकिलाचाही सल्ला घेऊ. त्यानंतर समिती सर्वांशी चर्चा करुन लवकरच याबाबत निर्णय घेईल असे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.हेदेखील वाचा- धक्कादायक! धावत्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये बस क्लिनरकडून 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार, वाशिममधील घटना
दरम्यान आज वाशिममध्ये एका खासगी ट्रॅव्हल्समध्ये (Private Travels) बसच्या क्लिनरने 21 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धावत्या ट्रॅव्हल्समध्ये या आरोपीने तरुणीवर बलात्कार करुन याची कुठे वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून तिला फेकून देण्याची धमकी दिली. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे वाराणसीहून औरंगाबादमध्ये आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला आहे. रविवारी रात्री औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
एकूणच या घटनांचा विचार करता लवकरात लवकर यावर कठोर कायदा यावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहेत.