Select My CIDCO Home: सिडकोच्या 'सिलेक्ट माय सिडको होम' योजनेला उत्तम प्रतिसाद; प्राप्त झाले 92,000 अर्ज, नोंदणीसाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “परवडणाऱ्या किमतींव्यतिरिक्त, ही गृहनिर्माण योजना नागरिकांना नवी मुंबईची समृद्ध जीवनशैली तसेच उत्कृष्ट पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि दर्जेदार बांधकाम अनुभवण्याची संधी देते.’

CIDCO (संग्रहित संपादित प्रतिमा)

सिडकोच्या (CIDCO) ‘सिलेक्ट माय सिडको होम’ (Select My CIDCO Home) सामूहिक गृहनिर्माण योजनेला उत्तम म्प्रतीसाद मिळत आहे. ही योजना सुरू झाल्यापासून एका महिन्याच्या कालावधीत 92,000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. आता अधिकाधिक नागरिकांना योजनेसाठी अर्ज करता यावा यासाठी योजनेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी 11 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोने 11 ऑक्टोबर 2024 रोजी 'सिलेक्ट माय सिडको होम' मास हाऊसिंग योजना सुरू केली होती.

या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट आणि कमी उत्पन्न गट श्रेणींसाठी, नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोड येथे 26,000 सदनिका उपलब्ध करून दिल्या गेल्या. या गृहनिर्माण योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे अर्जदार त्याच्या/तिच्या आवडीची सदनिका निवडू शकतो.

सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “परवडणाऱ्या किमतींव्यतिरिक्त, ही गृहनिर्माण योजना नागरिकांना नवी मुंबईची समृद्ध जीवनशैली तसेच उत्कृष्ट पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि दर्जेदार बांधकाम अनुभवण्याची संधी देते.’ अधिकाधिक नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करता यावा आणि नवी मुंबईत त्यांचे स्वप्नातील घर खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी योजनेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी 11 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी वाढवलेल्या मुदतीमुळे अर्जदारांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. (हेही वाचा: Mumbai Local Train News Update: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वे 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी ट्रेन सेवा चालवणार, जाणून घ्या सविस्तर)

यासह, बारकोड केलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. आता, अर्जदार ऑनलाइन नोंदणी दरम्यान बारकोड नसलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करू शकतात. मात्र, वाटप पत्र देण्यापूर्वी, अर्जदारांना बारकोड केलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. यासह 100/- रु. किंवा 500/- रु. वर प्रतिज्ञापत्र/हमीपत्र सादर करण्याची अटही शिथिल केली आहे. अर्जदार आता साध्या कागदावर स्वयं-साक्षांकित प्रतिज्ञापत्र/हमीपत्र सादर करू शकतात.