Schools Reopen in Maharashtra: पहिलीपासूनच्या सर्व शाळा येत्या 10 ते 15 दिवसांत सुरु होण्याचे राज्य सरकारचे संकेत

राज्यातील शहर आणि ग्रामीण भागातील इयत्ता पहीली ते पुढील सर्व इयत्तांच्या शाळा येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये सुरु (Schools Reopen in Maharashtra) होण्याचे संकेत आहेत.

School | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची तिसरी लाट मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता कमी दिसत असल्याने राज्य सरकार एक पाऊ पुढे टाकताना दिसत आहे. राज्यातील शहर आणि ग्रामीण भागातील इयत्ता पहीली ते पुढील सर्व इयत्तांच्या शाळा येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये सुरु (Schools Reopen in Maharashtra) होण्याचे संकेत आहेत. मात्र, कोरोना कृती दलाकडून देण्यात येणारा सल्ला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची (CM Uddhav Thackeray) मान्यता यानंतरच याबाबत ठोस निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे समजते.

राज्यातील सर्व इयत्तांच्या शाळा सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल (मंगळवार, 16 नोव्हेंबर) एक बैठक पार पडली. या बैठकीत शाळा सुरु करण्यावर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव आणि इतर अधिकारीही उपस्थित होते. आदर्श शाळा योजनेच्या निधी उपलब्धतेसंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत चर्चा झाली. (हेही वाचा, Schools Reopen in Maharashtra: राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु; शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह पालकांनाही करावे लागणार 'या' नियमांचे पालन)

राज्यातील कोरोना व्हायरस संसर्गाचे आणि संक्रमितांचे प्रमाण घटते आहे. त्यामुळे राज्य पुन्हा एकदा पूर्वस्थितीवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता शाळा पुन्हा सुरु कराव्यात यासाठी राज्यभरातून शिक्षणसंस्था आणि पालक वर्गातून दबाव वाढतो आहे. इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे ग्रामीण भागातील वर्ग आणि शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग या आधीच सुरु करण्यात आले आहेत. आता त्याच धरतीवर इयत्ता पहिलीपासूनचे सर्व वर्गही सुरु करण्यात यावेत अशी मागणी होत आहे.

राज्यात उपचार घेत असलेल्या कोरोना संक्रमितांची संख्या 12000 आहे. हीच संख्या काही महिन्यांपूर्वी लाखांच्या घरात होती. संक्रमित होण्याचे सरासरी प्रमाणही मोठे होते. दरम्यान, आता हे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे राज्य कोरोनामुक्तीकडे निघाले असल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे आता शाळा सुरु होण्यास कोणतीही आडकाठी नाही. त्यामुळे शाळा सुरु व्हाव्यात अशी मागणी होत आहे.