Maharashtra Monsoon Update: सातारा, परभणीसह राज्याच्या विविध भागांना बसला अवकाळी पावसाचा फटका, शेतपिकांचे प्रचंड नुकसान

सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुकयातील कवठे इथल्या वेताळमाळ परिसरात वीज अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाला.

Monsoon In Maharashtra 2020 | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

Maharashtra Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान काल झालेल्या अवकाळी पावसानं राज्याच्या विविध भागाला झोडपून काढले. यामुळे शेतपिकांचे व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. या अवकाळी पावसाने बळीराजा देखील हवालदिल झाला आहे. सातारा शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुकयातील कवठे इथल्या वेताळमाळ परिसरात वीज अंगावर पडल्याने दोघांचा मृत्यू झाला.

परभणी शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठोळा शिवारात रविवारी सायंकाळी वीज कोसळून दोघा मेंढपाळाचा मृत्यू झाला. जितुंर तालुक्यात विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह सुमारे एक तास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे फळबागांना मोठा फटका बसला.

बीड तालुक्यात नेकमूर मध्ये राधाबाई लोखंडे या रविवारी दुपारी शेतात काम करत होत्या. तेव्हा पाऊस पडू लागला तेव्हा त्या घरी परतत होत्या. याच दरम्यान त्यांच्यावर वीज पडून मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की, राधाबाई यांच्यावर वीज पडली त्यावेळी त्यांच्या सासू सुद्धा तेथेच होत्या. त्यांना सुद्धा हलकी दुखापत झाली आहे. मृतक राधाबाई आठ महिन्यांची गर्भवती होती. अन्य एका घटनेत केज तालुक्यात पिट्टीघाट मधील गीता जगन्नाथ थॉब्रे यांचा मृत्यू झाला आहे. गीता जेव्हा शेतात काम करत होत्या त्यावेळी त्यांच्यावर वीज पडली.

हेदेखील वाचा- Maharashtra Monsoon Update: पुणे, मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये आज किंवा उद्यामध्ये पावसाची शक्यता- IMD

हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसात वसमत तालुक्यांत वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एक बैलही ठार झाला.

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेडनेट, आंबा फळांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. या हवामानामुळं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. विदर्भात मात्र कमाल पारा चाळीस अंशांच्या आसपास आहे.