Ashadhi Wari 2023: ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या पुण्यात जल्लोषात आगमन, या ठिकाणी असेल आज मुक्काम

यंदा सात ते आठ लाख वारकऱ्यांचे पुण्यनगरीत आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

Ashadhi Wari (PC - ANI)

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं आज पुण्यनगरी पुण्यात जल्लोषात मुक्कामासाठी आगमन झाले आहे. पुण्यातल्या संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्या एकमेकांना भेटल्या आहेत. या दोन्ही पालखीत वारकऱ्यांची अलोट गर्दी झाली आहे. लाखो वारकरी पुण्यात दाखल झाल्यानं पुण्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. पुणेकरांनी मोठ्या भक्तीभावाने दोन्ही पालख्यांचे जल्लोशात स्वागत केले आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकरांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. पुणे महापालिकेच्या वतीनं पाटील इस्टेट परिसरात दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले.

विठूरायाच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेनं निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पुणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. आज या दोन्ही पालख्यांचे पुण्यनगरीतच मुक्काम असणार आहे. . संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) येथे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री निवडुंगा विठोबा मंदिरात (नाना पेठ) येथे असणार आहे. पुणेकरांना उद्या दोन्ही पालख्यांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.

पालखीच्या आगमनासाठी पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली होती. यंदा सात ते आठ लाख वारकऱ्यांचे पुण्यनगरीत आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पालखी सोहळ्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी यंदा साडेसात हजार पोलिस तैनात करण्यात आले होते.

यादरम्यान पालखी सोहळ्यात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दिंडीत पंगत सेवा दिल्याचे पाहायला मिळाले. सुषमा अंधारे यांनी दिंडीतील वारकऱ्यांसाठीच्या पंगत सेवेदरम्यान चपात्या लाटतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे या वरकरी महिलांसोबत चपात्या लाटताना दिसत आहेत.