Sansad Ratna Awards 2020: महाराष्ट्रातील अमोल कोल्हे, हिना गावित यांना ‘संसद रत्न 2020’ पुरस्कार जाहीर; सुप्रिया सुळे यांना मिळणार 5 वर्षांत एकदा प्रदान होणारा 'संसद महारत्न पुरस्कार'

प्राइम पॉईंट फाऊंडेशनने (Prime Point Foundation) बुधवारी याबाबत माहिती दिली.

हीना गावित, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे (संग्रहित संपादित प्रतिमा)

17 व्या लोकसभेच्या  (Lok Sabha) पहिल्या वर्षाच्या कामगिरीवर आधारित, लोकसभेचे आठ सदस्य आणि राज्यसभेच्या दोन सदस्यांना विविध श्रेणी अंतर्गत संसद रत्न पुरस्कार 2020 (Sansad Ratna Awards 2020) देण्यात येणार आहे. प्राइम पॉईंट फाऊंडेशनने (Prime Point Foundation) बुधवारी याबाबत माहिती दिली. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनंतर, 2010 पासून प्राइम पॉईंट फाउंडेशन लोकसभेतील सर्वोच्च कामगिरी करणारे खासदार यांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करत आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बारामतीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना वादविवाद, विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या आणि 17 व्या लोकसभेच्या पहिल्या वर्षात सादर केलेली खासगी सदस्यांची बिले, अशा एकूण कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्कार 2020 प्राप्त झाला आहे.

राज्यातील, सुभाष रामराव भामरे (Subhash Bhamre)- भाजप धुळे, हिना गावित (Heena Gavit)- भाजप, नंदुरबार आणि अमोल रामसिंग कोल्हे (Amol Kolhe)- राष्ट्रवादी, शिरूर यांना उपस्थित केलेले प्रश्न, महिला आणि प्रथम-खासदार या श्रेणीमध्ये संसद रत्न पुरस्कार 2020 देण्यात येणार आहे. शशी थरूर (कॉंग्रेस, तिरुअनंतपुरम, केरळ), निशिकांत दुबे (भाजप, गोड्डा, झारखंड), अजय मिश्रा (भाजप, खेरी, उत्तर प्रदेश) आणि राम मोहन नायडू (टीडीपी, श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश) यांना, त्यांच्या एकूण गुणात्मक कामगिरीसाठी आणि वैयक्तिक प्रयत्नांसाठी 'ज्युरी कमिटी स्पेशल अवॉर्ड' ने सन्मानित केले जाईल. (हेही वाचा: 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना' भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका)

लोकसभेच्या अनुषंगाने पहिल्या वर्षातील एकूण कामगिरीच्या आधारे पुरस्कारासाठी नामित झालेले राज्यसभेचे सदस्य, विशंभर प्रसाद निषाद (समाजवादी पार्टी, उत्तर प्रदेश) आणि छाया वर्मा (कॉंग्रेस, छत्तीसगड) आहेत. प्राइम पॉईंट फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, भरतृहरी महताब (बीजद, कटक, ओडिशा), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी, बारामती, महाराष्ट्र) आणि श्रीरंग आप्पा बारणे (शिवसेना, मावळ, महाराष्ट्र) यांना 'संसद महा रत्न पुरस्कार' (Sansad Maha Ratna Award) देण्यात येणार आहे. 16 व्या लोकसभेत त्यांच्या सातत्यपूर्ण गुणात्मक कामगिरीबद्दल हा पुरस्कार पाच वर्षांतून एकदा दिला जातो.



संबंधित बातम्या