आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरणाचं ट्विट डिलीट केल्याच्या प्रश्नावर संजय राऊत दिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले

मोफत लसीकरणाचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी डिलीट का केले यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

येत्या 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाचे लसीकरण केले जाणार आहे. यात अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकार देखील मोफत लसीकरण (Free COVID Vaccination) जाहीर करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. मात्र काही वेळानंतर ते ट्विट डिलीट केले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोफत लसीकरणाचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी डिलीट का केले यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"हा सरकारचा विषय आहे. मी काही बोलू शकत नाही. यासंदर्भातील निर्णय राज्य सरकार घेईल. आदित्य ठाकरे कॅबिनेटचे सदस्य आहेत. जनतेच्या हिताचा निर्णय कोणत्याही राजकारणाशिवाय घेतले जातात. हे सरकार प्रत्येक पाऊल जीव वाचवण्यासाठी टाकत आहे. संकटाच्या वेळी राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. मोफत लसीकरणावर कोणतेही प्रमुख मंत्री सांगतील," असं संजय राऊत यांनी सांगितलं.हेदेखील वाचा- COVID-19 Vaccine: मुंबईत वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरु- किशोरी पेडणेकर

"करोना संकटाचा सामना धैर्याने केला जात असून मुंबईतही डबलिंग रेट कमी झाला आहे. मुंबईत करोना नियंत्रणात येत आहे. विरोधकांनी राजकारण करण्याची ही वेळ नसून सरकारसोबत खांद्याला खांदा लावून संघर्ष केला तरच संकट मागे जाईल. मुख्यमंत्री पूर्ण जोर लावत आहेत," असं संजय राऊत म्हणाले आहेत.

काय होते आदित्य ठाकरे यांचे ट्विट:

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस कधी मिळणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यातच आदित्य ठाकरे यांनी मोफत लसीकरणाबाबतचे एक ट्विट केले होते. परंतु, त्यांनी काही काळानंतर हे ट्वीट डिलीट केले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'राज्य सरकारकडून मोफत लसीकरण करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अधिकृत लसीकरण धोरणाबाबत गोंधळ होऊ नये म्हणून मी पूर्वीचे ट्विट हटवले आहे, असे ते म्हणाले आहेत. तसेच लसीकरणाबाबत अधिकृत धोरण समितीद्वारे घोषाण केली जाणार आहे. झालेल्या गोंधळासाठी मी दिलगीर व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.