Sanjay Raut Reaction on Budget 2021: हा अर्थसंकल्प देशाचा आहे की एखाद्या पक्षाचा आहे- संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी "हा देशाचा अर्थसंकल्प होता की एखाद्या पक्षाचा" अशी टिका करत बजेटकडे बोट दाखवले आहे.
आज संसदेत वित्तमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2021-22) सादर केला. त्यानंतर संपूर्ण देशभरात या बजेट संदर्भात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी "हा देशाचा अर्थसंकल्प होता की एखाद्या पक्षाचा" अशी टिका करत बजेटकडे बोट दाखवले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप (BJP) पक्षावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
"महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहे. आकडे अर्थमंत्री देत आहेत. त्यातले किती आकडे खरे आहेत? किती खोटे आहेत? हे सहा महिन्यात कळेल" अशी बोचरी टिका करत संजय राऊतांनी अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली.हेदेखील वाचा- Share Market: केंद्राचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये तेजी, सेनसेक्स 406 अंकानी खुलला
"अर्थसंकल्प कोणाचाही असेल पण थापा मारणं बंद केलं पाहिजे. हा अर्थसंकल्प देशाचा आहे की एखाद्या पक्षाचा आहे? पक्षाचं निधीवाटप सुरू आहे का? असा प्रश्न लोकांना पडलाय" असं देखील यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.
बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी नागपूर मेट्रो फेज 2, नाशिक मेट्रो फेज 1 ची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुक सेवा सुधाण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय सार्वजनिक बस सेवेसाठी अर्थसंकल्पात 18 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय वर्दळ असणाऱ्या रेल्वेमार्गावर ऑटोमॅटिक पद्धती बसवणार आहे. ज्यासाठी 1 लाख 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयासाठी 1,10,055 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून रस्ते वाहतूक मंत्रालयासाठी 1,18,101 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.