संजय राऊत यांनी 'छपाक' आणि 'तान्हाजी' साठी दर्शवले समर्थन; भाजप गुंडगिरी करत असल्याची केली टीका
चित्रपटावर बहिष्कार घालण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले आहे.
बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने दिल्लीतील जेएनयूमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर तिच्यावर विविध स्तरांवरून टीका करण्यात आल्या. परंतु, चित्रपटावर बहिष्कार घालण्याची भाषा करणाऱ्यांना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज चोख प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “प्रश्न दीपिका किंवा ‘तान्हाजी’चित्रपटाचा नाही. प्रश्न आहे तो या देशातील वातावरणाचा. भाजपचे शासन असलेल्या राज्यात गुंडगिरीने ‘तान्हाजी’ उतरवला जातो. ‘छपाक’च्या बाबतीतही तेच घडत आहे. मात्र, हा देश या तालिबानी संस्कृतीला थारा देणार नाही. तान्हाजी आणि छपाक हे दोन्ही सिनेमा अप्रतिम आहेत. बेळगावात तान्हाजी बंद करणाऱ्या कर्नाटकातील भाजप सरकारकडे यांचं काय उत्तर आहे?”
दरम्यान, या प्रकरणात बॉलीवूड मधील काही मोजक्याच कलाकारांनी भूमिका घेतली आहे. त्यात अनुराग सिन्हा, शबाना आझमी, अनुराग कश्यप यांचा समावेश आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी इतर बॉलीवूड कलाकारांना थेट सवाल विचारले आहेत. ते म्हणाले, "बाकीचे कुठे आहेत? अनुपम खेर आज कुठे आहेत? सरकारच्या मंचावर असलेल्यांच्या दृष्टीने दीपिका पदुकोण कलाकार नाही का? या लोकांना बाकीचे सर्व रिकामी डबडी वाटत आहेत काय?"
त्यांनी भाजपच्या जम्मू काश्मीरमधील मित्रपक्षाचे उदाहरण देऊन त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “एखाद्याची भूमिका पटली नाही तर भाजप त्यांना देशद्रोही कसं ठरवतं? दीपिकाची विचारसरणी काय आहे हे मला माहिती नाही, परंतु मला तिचं कौतुक वाटतं. ज्या काश्मीरमध्ये भाजपने देशद्रोह्यांबरोबर सत्ता स्थापन केली त्याबद्दल तर दीपिका बोलली नाही ना? तिने त्याबद्दल भूमिका घेतली नाही ना? ती फक्त JNU मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना भेटली. मग तिथे तिने मूकपणे संवेदना व्यक्त केल्या, तर तिला देशद्रोही ठरवून तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका अजिबात योग्य नाही.”