Rajya Sabha Election 2022: 'महाराजांना राजकीय पक्षाचे वावडे नसावे' म्हणत संभाजीराजे छत्रपती यांचा विषय संपवला, शिवसेनेकडून संजय पवार यांना संधी, लवकरच घोषणा
शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यास दुजोराही दिला. मात्र, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले.
शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांची निवड राज्यसभा उमेदवारीसाठी जवळपास निश्चित झाली आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यास दुजोराही दिला. मात्र, लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले. या वेळी बोलताना त्यांनी शिवसेनेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा चॅप्टर क्लोज झाला आहे. शिवसेनेने या आगोदर प्रितिश नंदी, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेकांना राज्यसभेवर पाठवले आहे. हे सर्वजण शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, अशी आठवणही संजय राऊत यांनी या वेळी सांगितली.
संजय पवार हे शिवसेनेचे मावळे आहेत. मावळे असतात म्हणून राजे असतात. राजांना राजकीय पक्षाचे वावडे असण्याचे कारण नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी या वेळी कोणाचेही नाव न घेता लगावला. दरम्यान, शिवसेनेला छत्रपतींच्या घराण्याबाबत पूर्ण आदर आहे. या आधीही छत्रपतींच्या घरातील अनेक सदस्यांनी राजकीय निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या आहेत. मोठे शाहू महाराज, मालोजीराजे यांनी देखील राजकीय पक्षाकडून निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास हरकत नव्हती. आता आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
संजय पवार कोण आहेत?
संजय पवार हे कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत. पाठीमागील 30 वर्षे ते शिवसेनेत सक्रीय आहेत. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. 1989 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यापासून ते कट्टर शिवसैनिक आहेत. कोल्हापूर महापालिकेत ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पाठीमागील 30 वर्षे ते शिवसेनेकडून विधानसभेचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. पण ऐनवेळी तिकीट त्यांना हुलकावणी देत होते. सर्वसामान्यांच्या बाजूने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. भाजप, काँग्रेस अशा अनेक पक्षांनी त्यांना अनेक वेळी विविध अमिष दाखवली. पक्षप्रवेशाच्या ऑफर दिल्या. मात्र, असे असूनही त्यांनी शिवसेना आणि शिवसेनेचा भगवा सोडला नाही. त्यामुळे त्यांची पक्षनिष्टा आता कामाला येणार असे चित्र सध्यातरी दिसते आहे.