Mumbai Police Transfer: सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद, मुंबई पोलीस दलात बदलीची लाट; 65 पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी

त्यानंतर या पदावर हेमंत नागराळे यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार घेताच हेमंत नागराळे यांनी मुंबई पोलीस दलात फेरबदल करणार असल्याचे संकेत दिले होते.

Mumbai Police| Representational Image (Photo Credits: ANI)

मुंबई पोलीस दलातील ( Mumbai Police Force) तब्बल 86 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Mumbai Police Transfer) करण्यात आल्या आहेत. सचिन वाझे प्रकरण ( Sachin Vaze Case) त्यातच मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी केलेले आरोप या सर्वांचे जोरदार पडसात उमटताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात बदल्यांची लाटच पाहायला मिळाली. एकाच वेळी तब्बल 86 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यापैकी मुंबई गुन्हे शाखेतील 65 अधिकाऱ्यांना इतरत्र हालवले आहे. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून या बदल्यांकडे पाहिले जात आहे. या बदल्यांमुळे अनेक काही प्रमाणात नाराजीही पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने सचिन वाझे यांच्या सीआययु युनिटचे एपीआय रियाझुद्दीन काझी आणि प्रकाश होवाळ यांचीही बदली करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांचे निवास्थान असलेल्या अँटिलीया बाहेर जिलेटिनच्या कांड्या असलली स्कॉर्पिओ सापडली. त्यानंतर या स्कॉर्पिओशी एपीआय सचिन वाझे यांचा संबंध पुढे आला. पुढे तर या प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन यांचाच गुढ मृत्यू झाला. त्यामुळे प्रकरणातील गुंतागुंत वाढत गेली. विरोधी पक्षाने हा मुद्दा उचलून धरला. यात मुंबई पोलीस आणि राज्य सरकार अशा दोघांचीही प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकार आणि मुंबई पोलीस या दोघांनाही प्रतिमासंवर्धनासाठी बरेच काम करावे लागणार आहे. त्यातूनच या बदल्या झाल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा, ATS On Mansukh Hiren Death Case: सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार- एटीएस)

सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटविण्यात आले. त्यानंतर या पदावर हेमंत नागराळे यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार घेताच हेमंत नागराळे यांनी मुंबई पोलीस दलात फेरबदल करणार असल्याचे संकेत दिले होते.

प्रामुख्याने ज्या अधिकाऱ्यांनी मुंबई गुन्हे शाकेत अधिक काळ काढला आहे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हा बदल्या नियमीतपणे होणाऱ्या प्रशासकीय बदल्या असल्याचे सांगितले जात असले तरी, याला सचिन वाझे प्रकरणाची पार्श्वभूमी असल्याचेच बोलले जात आहे.