भारत निश्चितच विश्वगुरु होईल- मोहन भागवत
काही वर्षात भारताची प्रतिष्ठा वाढल्यामुळे भारत निश्चितच विश्वगुरु होईल, असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला.
शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने चालणारा आपला देश असून हिंसेने फक्त नुकसानच होते. गेल्या काही वर्षात भारताची प्रतिष्ठा वाढल्यामुळे भारत निश्चितच विश्वगुरु होईल, असा विश्वास मोहन भागवत यांनी व्यक्त केला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलत होते. पुढे ते म्हणाले की, "भारत इतका बलवान व्हावा की आक्रमक करण्याचे कोणाचे धाडसच होऊ नये."
विजयादशमी उत्सवात मोहन भागवत काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. भाषणापूर्वी मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघ स्वयंसेवकांचे पथ संचलन केले.
यावेळी संघाच्या विजयादशमी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्याचबरोबर नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.
देशाचे जवान आपल्यासाठी सीमेवर लढत असतात. आपल्या सुरक्षेसाठी ते बलिदान देतात. त्यामुळे जवानांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी सांगितले. देश आपला असून आपण तो सरकारकडे का सोपावला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारबरोबर समाजाचीही जबाबादारी असते. त्यामुळे सरकारसोबत जनतेनेही विकासात सहभागी व्हायला हवे. सर्व काही सरकारवर सोपवू नये. नेतृत्व कोणाकडे द्यायचे हे पूर्णपणे जनतेच्या हातात असते, असेही ते म्हणाले. कामाचा वेग वाढवण्याची गरज असल्याची जाणीव त्यांनी यावेळी बोलताना करुन दिली.
आपल्या भाषणात त्यांनी पोलीस दलाच्या अवस्थेवरही मत मांडले. सध्या देशात पोलीस दलाची अवस्था चांगली नसून कामाचे स्वरुप विचित्र आहे. त्याची योग्य रचना करणे गरजेचे असल्याचे भागवत यावेळी म्हणाले.
शस्त्रास्त्रात प्रबळ असणाराच सुरक्षित असतो. आपल्या सुरक्षेसाठी इतरांवर अवलंबून राहू नये. सुरक्षिततेच्या बाबतीत आपण अधिक स्वावलंबी व्हायला हवे. स्वावलंबन नाही तर सुरक्षितता नाही, असे परखड मत त्यांनी यावेळी मांडले.
शेजारच्या देशाचे सरकार बदलले पण त्यांची नियत नाही, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता टीका केली.