रोहित पवार यांच्या पीए ची 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू; घराजवळ आढळला मृतदेह
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशवतारे यांची १२ वर्षांची मुलगी शनिवारी रात्री घरातून निघून गेल्यानंतर रविवारी सकाळी तिच्या राहत्या घराजवळ मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
बारामती (पुणे) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे स्वीय सहाय्यक अजित दशवतारे यांची 12 वर्षांची मुलगी संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळली. रविवारी सकाळी बारामती तालुक्यातील रुई गावातील साईनगर परिसरात तिचा मृतदेह त्यांच्या राहत्या इमारतीजवळ आढळून आला. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी सर्व शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुलीचा तिच्या आईशी एका विषयावरून किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर ती रागाच्या भरात घरातून निघून गेली आणि परत आली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने रात्रीच पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. रविवारी सकाळी सुमारे साडेआठ वाजता तिचा मृतदेह घराजवळच आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून न्यायवैद्यक पथकानेही पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, हे प्रकरण आत्महत्या आहे की यामागे अन्य कारण आहे, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
रोहित पवार यांची प्रतिक्रिया
#WATCH | Baramati, Maharashtra: NCP-SCP MLA Rohit Pawar says, "... My private assistant Ajit’s 15-year-old daughter went missing last night, and a police complaint was filed. After search efforts by the family and police, her body was found near their building at around 8.30am… pic.twitter.com/8SfdFTdffH
— ANI (@ANI) August 23, 2026
घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार बारामतीत दाखल झाले आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशीही चर्चा केली. पवार यांनी सांगितले की, अजित दशवतारे हे त्यांच्या जिल्हा परिषद कार्यकाळापासून त्यांच्यासोबत आहेत आणि या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
पवार यांनी नमूद केले की, मुलीचा मृतदेह रविवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या राहत्या इमारतीजवळ आढळला आणि आदल्या रात्री ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित माहिती असलेल्या किंवा शंका व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले असून, योग्य पद्धतीने तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. या भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
पुढील तपास सुरू
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सर्व शक्यता लक्षात घेऊन केला जात असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2026 02:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

