Resident Doctors Strike: महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप मागे; OPD सुरू

त्यामुळे अनेक रूग्नांची गैरसोय होत होती पण आता अखेर मार्डच्या निवासी डॉक्टरांनी नरमती भूमिका घेतल्याने आता अनेकांचा त्रास कमी झाला आहे.

Doctor | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

नीट पीजी समुपदेशन (NEET-PG 2021 Counselling) आणि इतर काही मागण्यासांसाठी निवासी डॉक्टरांनी 27 नोव्हेंबरपासून संपाचं हत्यार उपसलं होतं. मात्र काल (6 डिसेंबर) मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांची संघटना 'मार्ड' (MARD) ने आपाला संप मागे घेतला आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृती अस्वास्थ्यामुळे थेट भेटींपासून थोडे अलिप्त आहेत. पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून काल आदित्य ठाकरेंनी बैठक घेतली. ती सकारात्मक झाली आहे आणि त्यांच्याकडून मिळालेल्या आश्वासनानंतर आता 'मार्ड' ने संप मागे घेत वैद्यकीय सेवा पुन्हा सुरू केल्याचं म्हटलं आहे.

मार्डच्या संपामुळे अनेक रूग्णालयामध्ये ओपीडी कक्ष बंद होते. त्यामुळे अनेक रूग्नांची गैरसोय होत होती पण आता अखेर मार्डच्या निवासी डॉक्टरांनी नरमती भूमिका घेतल्याने आता अनेकांचा त्रास कमी झाला आहे.

बीएमसीचे 'ऋणानुबंध' विद्यावेतन पुढील महिन्यात दिले जाणार आहे. तर निवासी वसतिगृहांमध्ये गर्दी टाळण्यासाठी म्हाडाच्या इमारतींमध्ये सुरू असलेल्या वसतिगृहांना मुदतवाढ देण्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मार्डने स्पष्ट केले आहे. NEET PG 2021 Counselling प्रक्रिया लवकर सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला विनंती करणार आहे. राज्याच्या बाजूने अतिरिक्त विलंब टाळण्यासाठी NEET PG समुपदेशनाची प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रकरणी पाठपुराव्यासाठी आणि योग्य तयारीसाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भारतामध्ये निवासी डॉक्टरांच्या एकूण 50 हजार जागा आहेत. राज्यात निवासी डॉक्टरांच्या पहिल्या वर्षाच्या एकूण अडीच हजार जागा आहेत. महाराष्ट्रात साडे पाच हजारच्या जवळपास निवासी डॉक्टर सध्या काम करत आहेत. पण पीजी-नीटच्या जागा अजूनही न भरल्याने निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण आला आहे. मुंबईत 400 निवासी डॉक्टरांवर रुग्णालयांचा भार आहे. दरम्यान डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रुग्णसेवा देताना अडचणी येत असल्याचं निवासी डॉक्टरांचं मत आहे.